(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वर्ध्यात हरतालिकाचं विसर्जन करताना दोन महिलांसह चौघे बुडाले
वर्ध्यातील हिंगणघाटच्या वणा नदीपात्रात चौघे जण बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध सुरु आहे.
वर्धा : हरतालिकानिमित्त गौरी विसर्जनास गेलेल्या दोन महिलांसह एक मुलगा आणि एक मुलगी नदीपात्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वर्ध्यातील हिंगणघाटच्या वणा नदीपात्रातही घटना घडली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य तीन जणांचा शोध सुरु आहे.
हिंगणघाटच्या शास्त्री वॉर्डातील काही महिला वणा नदी रेल्वे पुलाजवळ कवडघाट भागात गौरी विसर्जन करण्यास गेल्या होत्या. त्यावेळी रिया रंजित भगत यांच्यासोबत मुलगा अभी व मुलगी अंजना हे दोघे सोबत होते. यावेळी आईसोबत नदीपात्रात गेलेला अभी पाण्यात वाहू लागल्याने बहीण अंजना त्याला वाचवण्यासाठी धावली. ती देखील पाण्यात बुडत असल्याचे दिसताच आई रिया भगतने धाव घेतली. या तिघांना वाहताना पाहून शेजारच्या दिपाली भटे यांनीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यादेखील पाण्यात वाहून गेल्या. यावेळी वणा नदी पुलाजवळ एक महिला वाहून जात असल्याचे दिसताच क्षणाचाही विलंब न करता पोलीस रामदास चाकोले यांनी नदीच्या पाण्यात उडी घेतली आणि रिया भगत यांना पाण्याबाहेर काढलं. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध सुरु आहे.