Meera Borwankar on Ajit Pawar : येरवडा जमीन विक्रीचा दबाव, अजित पवारांवरील आरोपांवर मीरा बोरवणकर यांनी आता स्पष्टच म्हटले...
Meera Borwankar on Ajit Pawar : अजित पवार यांच्यावर जमीन विक्रीबाबत आरोप केल्यानंतर राजकारण तापले असताना मीरा बोरवणकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नवी दिल्ली: माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांच्या 'मॅडम कमिश्नर' या पुस्तकातील एका प्रकरणात अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाने राज्यातील राजकारण तापले असताना दुसरीकडे माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मॅडम कमिश्नर' या पुस्तकात 38 प्रकरणे आहेत. येरवड्यातील जमिनीबाबत फक्त एकच प्रकरण आहे. त्यामुळे एकाच प्रकरणापुरते पुस्तकाला संकुचित करू नका, असे आवाहन त्यांनी केले.
माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांबाबत त्यांनी भाष्य केले. मीरा बोरवणकर यांनी म्हटले की, पुस्तकात 38 प्रकरणे आहेत. यामध्ये एकतर्फी प्रेमात तरुणीची झालेली हत्या, जळगाव सेक्स स्कँडल, मानवी तस्करी अशी विविध प्रकरणे या पुस्तकात आहेत. एकाच प्रकरणाबद्दल मला विचारणा करू नका. एकाच प्रकरणाबद्दल त्याला संकुचित करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. हे पुस्तक प्रशासन, उत्कृष्ट तपास, मुली-महिलांचे शोषण अशा विविध मुद्यांवर आहे. हे पुस्तक सगळ्यांनी विशेषत: मुलींनी, महिलांनी वाचावे, असेही बोरवणकर यांनी म्हटले.
अजित पवारांच्या आरोपांबाबत काय म्हणाल्या?
मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्या प्रकरणाबाबत म्हटले की, अजित पवार यांनी लिलाव केला नाही, हे सत्य आहे. पुणे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीच्या लिलावासाठी सरकारने एक समिती नेमली होती. त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली. माझ्याकडे कार्यभार असल्याने ही जमिनीवरील ताबा सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती. अजित पवारांनीदेखील हाच आग्रह धरला होता. लिलाव झाल्याने आता हस्तांतरण प्रक्रिया सुरू करा असे त्यांनी म्हटले. मात्र, माझ्या दृष्टीने ती जागा महत्त्वाची होती. पुणे पोलीस आयुक्तालय, पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी ही जागा वापरता आली असती. त्यामुळे मी त्या तीन एकर जमिनीच्या लिलावाला आक्षेप घेत हस्तांतरणाला विरोध केला असल्याचे बोरवणकर यांनी म्हटले.
2 जी घोटाळ्याचा फायदा
मीरा बोरवणकर यांनी म्हटले की, शाहीद बलवा या बिल्डरला जमीन देण्यात येणार होती. लिलावात त्यांनी बाजी मारली. मात्र, 2 जी घोटाळ्यात पुढे सीबीआयने अटक केल्याने सरकारची संभाव्य होणारी अवहेलना टळली. एका अर्थाने 2 जी घोटाळ्यामुळे आम्हाला ती जमीन वाचवण्यासाठी चांगलेच बळ मिळाले.