(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Meera Borwankar : अजित पवारांनी तो मुद्दा प्रतिष्ठेचा केला, मुख्यमंत्र्यांचाही नाईलाज...बदलीबाबत मीरा बोरवणकर यांनी नेमकं काय म्हटले?
Meera Borwankar on Ajit Pawar : पोलीस दलाची जमीन खासगी बिल्डरला देण्यासा नकार दिल्यानंतर अजित पवारांनी तो मुद्दा प्रतिष्ठेचा केला. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचाही नाईलाज झाला असल्याचे बोरवणकर यांनी म्हटले.
पुणे : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांच्या 'मॅडम कमिश्नर' या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात तत्कालीन पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर येरवडा भागातील तीन एकर जागा बिल्डरला विकण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. मात्र, त्याशिवाय इतरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आपल्या पुस्तकात 'द मिनिस्टर' या नावाने एक अख्खं प्रकरण त्यांनी अजित पवारांवर लिहिलं आहे. अजित पवार यांनी तो मुद्दा इतका प्रतिष्ठेचा केला की तत्कालीन मुख्यमंत्र्यांचाही त्यांच्यासमोर नाईलाज झाला असल्याचे बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
अजित पवारांच्या आरोपाने व्यथित...
माजी पोलीस आयुक्त राहिलेल्या मीरा बोरवणकर यांनी म्हटले की, अजित पवारांना नकार दिल्याने आपली मुदती आधी पोलीस आयुक्त पदावरून बदली घडवून आणण्यात आली. अजित पवारांना नकार दिल्यावर एका महिन्याने पुण्यातील बिबवेवाडी भागात काही हिंसक घटना घडल्या. पालकमंत्री अजित पवारांनी त्याबद्दल माध्यमांशी बोलताना त्याचे खापर माझ्यावर फोडले. त्यामुळे व्यथित होऊन आपण वरिष्ठांना फोन करून दुसरीकडे बदली करण्याची मागणी केली. पण वरिष्ठांनी आपली समजूत घातली.
मुख्यमंत्र्यांचाही नाईलाज....
त्यानंतर काही दिवसांनी आपल्याला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला आणि तुम्हाला इतर कोणत्या ठिकाणी बदली हवी आहे अशी विचारणा करण्यात आली. त्यावर आपण सी आय डी पुणे मधे बदली करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री कार्यालयाने त्याला होकार दर्शवला. मात्र काही दिवसांनी स्वतः मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला आणि अजित पवारांनी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला आहे. आघाडी सरकार असल्याने आपला नाईलाज असल्याच सांगत मुख्यमंत्र्यांनी 'सीआयडी'मध्ये तुमची बदली करता येणार नाही असं आपल्याला सांगितलं असल्याचे बोरवणकरांनी पुस्तकात म्हटले. सध्या 'सीआयडी'कडे पुण्यातील मोठ्या बिल्डरांच्या अर्बन सिलिंग एक्ट मधील अनेक गंभीर प्रकरणं तापासाठी असल्याने तुम्हाला 'सीआयडी'मध्ये पाठवण्यास अजित पवारांचा विरोध असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सीआयडी सोडून पुण्यात आणखी कुठल्या जागी बदली हवीय असं बोरवणकर यांना विचारल. त्यानंतर बोरवणकर यांनी येरवडा कारागृहाची जबाबदारी सोपवण्याची मागणी केली आणि पुणे पोलीस आयुक्त पदावरून त्यांची येरवडा कारागृहात बदली करण्यात आली असल्याचे बोरवणकर यांनी आपल्पा पुस्तकात म्हटले.
पोलीस दलाची जमीन खासगी बिल्डरला विकण्याचा प्रयत्न
माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी 2010 मध्ये पोलीस दलाची तीन एकर जागा एका बिल्डरला विकण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप केला आहे. अजित पवारांनी विभागीय आयुक्तांना हाताशी धरून जमिनीचा व्यवहार जवळपास पूर्ण केला होता. मात्र आपण ही गोष्ट तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (R. R. Patil) यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी हा व्यवहार रद्द करून टाकल्याचं मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडन कमिशनर या आत्मचरित्रात म्हटले आहे. बोरवणकरांच्या या आरोपानंतर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत.
पुण्याच्या येरवडा भागात सध्या या आलिशान इमारती आणि भव्य बांधकामं पाहायला मिळतात. या इमारतींच्या शेजारी येरवडा पोलीस स्टेशन आहे. या पोलीस स्टेशनसह पोलीस दलाच्या ताब्यात असलेली इथली तीन एकर जागा 2010 साली अजित पवारांनी एका खासगी बिल्डरला विकण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे.