अल्पसंख्यांक कुटुंबातील एकापेक्षा जास्त मुलांना मिळणार 7.50 लाखांपर्यंत कर्ज; राज्य सरकारची घोषणा
मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून शैक्षणिक कर्ज योजना राबवण्यात येते
मुंबई : शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता अल्पसंख्यांकांसाठी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकूण 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज घेता येईल, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली
मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून शैक्षणिक कर्ज योजना राबवण्यात येते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत सध्या एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्याकरीता पाच लाख रुपये इतकी कर्जमर्यादा आहे, ती वाढवून आता 7 लाख 50 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.
त्याचबरोबर राज्य शासनाच्या भांडवलामधून राबविल्या जाणाऱ्या मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेसाठी सध्या असलेली 2 लाख 50 हजार रुपयांची कर्जमर्यादा वाढवून आता ती 5 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. यामुळे एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पुरेसे शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार असून त्यांचा शिक्षणाचा मार्ग अधिक सोपा होणार आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलातही राज्य शासनाने आता ७०० कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत आहे. यापुढील काळातही महामंडळाच्या विविध योजनांसाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत संपूर्ण प्रोत्साहन देण्यात येईल, असेही मंत्री नवाब मलिक म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Third Front : तिसऱ्या आघाडीसाठी ममता बॅनर्जी प्रयत्नशील, बिगरभाजप राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू
IPL 2022 Auction : अकोल्याच्या पोरांना आयपीएलचं तिकीट, गुजरात-पंजाब फ्रेंचायझींनी घेतलं विकत
Exam: अशी कोणती वस्तू आहे जी कोरडी असताना 1 किलो, ओली झाली तर 2 किलो आणि जळाली तर 3 किलो होते?