नांदेड जिल्ह्यात पहिल्या लेव्हलनुसार सोमवारपासून अनलॉक होणार, काय सुरु? काय बंद?
नांदेड जिल्ह्यात प्रथम स्तरानुसार सोमवारपासून अनलॉक होणार आहे. अनलॉकची गाईडलाईन्स जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत.
नांदेड : जिल्ह्यातील कोविड बाधितांचे प्रमाण शासन आणि नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे सद्यस्थितीत नियंत्रणात आले आहे. याचबरोबर कोविड उपचारात ऑक्सिजन बेड्सचे व्यापलेले प्रमाणही कमी झाले आहे. जिल्ह्यातील ही आकडेवारी लक्षात घेवून शासनाने नांदेड जिल्ह्याचे कोविड निर्बंध उठविण्याच्या पहिल्या स्तरामध्ये समावेश केला आहे. यामुळे जिल्ह्यातील निवडक सेवा, आस्थापना व उपक्रमांना मर्यादेत सुट देण्याचा निर्णय जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला. स्तर एकनुसार निर्बंध शिथीलीकरणाबाबत त्यांनी पुढील आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय व सुट असलेल्या खाजगी कार्यालये हे शंभर टक्क्यांसह सुरु राहतील. खेळ, क्रिडा प्रकार नियमित सुरु राहतील. धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक/करमणुकीचे कार्यक्रम/मेळावे यांना नियमित सुरु ठेवण्यास सुट दिली आहे. जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट्स, मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रिनसह), नाट्यगृह नियमित सुरु राहतील. लग्न समारंभाला शंभर व्यक्तींची मर्यादा घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी, खुली मैदाने, फिरणे, सायकलींग नियमित सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा, अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा नियमित सुरु राहतील.
विविध बैठका, निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा नियमितप्रमाणे होतील. जिल्ह्यातील बांधकाम नियमितप्रमाणे करता येईल. कृषि व कृषि पुरक सेवा, ई कॉमर्स - वस्तू व सेवा नियमित सुरु राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नियमितप्रमाणे निर्बंधाविना सुरु राहतील. मालवाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक /मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमित सुरु राहतील. खाजगी वाहने/टॅक्सी/बसेस/लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास नियमित सुरु राहतील. परंतु, स्तर पाचमध्ये जाण्यासाठी किंवा स्तरमध्ये थांबा घेवून पुढे जाणाऱ्या प्रवाशांना ई-पास आवश्यक राहील.
उत्पादक घटक (निर्माणक्षेत्र) अंतर्गत निर्यात जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची आवश्यकता असलेली उद्योगक्षेत्र, लघु व मध्यम उद्योगासह युनिट्स नियमित सुरु राहतील. निर्माणक्षेत्र यात
अ] अत्यावश्यक वस्तू निर्माण करणारे उद्योग
ब ] सातत्याने व निरंतर चालु असणारी उद्योगक्षेत्र
क] राष्ट्रीय सुरक्षे करिता आवश्यक संसाधनांची निर्मिती करणारे उद्योग
ड] डाटा सेंटर, क्लाउड सर्विसेस, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र इत्यादी व इतर सर्व निर्माण क्षेत्र जे अत्यावश्यक तसेच निरंतर उद्योग या सदराखाली समाविष्ट नाहीत ते सर्व नियमितपणे सुरु राहतील.
व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स हे नियमित सुरु राहतील. अंत्यविधी, अंतयात्रेसाठी 50 व्यक्तींचे निर्बंध घालण्यात आले आहेत.