एक्स्प्लोर
बनावट कागदपत्रांनी मिळवली नोकरी, 32 वर्ष शासनाला गंडवलं, सोलापुरातील शिक्षकाचा प्रताप
या शिक्षकाने 1988 साली खोटे बनावट प्रमाणपत्र सादर करुन दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील शाळेत सहशिक्षक पदाची नोकरी मिळवली.त्यानंतर तब्बल 32 वर्षांनतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सोलापूर : बनावट कागदपत्रे सादर करुन नोकरी मिळवून एका शिक्षकाने शासनाला चांगलंच गंडवलंय. आणि तब्बल 32 वर्षांनंतर हा प्रकार उघडकीस आलाय. आता या आरोपी शिक्षकाचे निलंबन करण्यात आलं असून त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी केलेल्या चौकशीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आमसिद्ध भिकप्पा बिराजदार असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील आहेरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. आरोपी आमसिद्ध बिराजदार यांनी मुंबईतील श्रीमती एस. के. सोमय्या ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन या महाविद्यालयातून डी.एड. चे शिक्षण घेतले असल्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र सादर केले. या प्रमाणपत्रावर वर्ष 1984 आणि प्राचार्य म्हणून पाटील यांची स्वाक्षरी आहे. मात्र तपास केले असता 1982 ते 1989 या कालावधीमध्ये पाटील नावाचे कोणीही प्राचार्य नव्हते. या कालावधीत श्रीमती कांताबेन आषार या प्राचार्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ज्या महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्याचा दाखला आरोपी शिक्षक आमसिद्ध बिराजदार यांनी दिला आहे ते महाविद्यालय महिला महाविद्यालय असल्याचे देखील चौकशीत स्पष्ट झाले आहे.
आरोपी आमसिद्ध बिराजदार यांनी 1988 साली हे खोटे बनावट प्रमाणपत्र सादर करुन दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील शाळेत सहशिक्षक पदाची नोकरी मिळवली. त्यानंतर तब्बल 32 वर्षांनतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे बोगस बनावट तयार करुन ते शासनास सादर करत शासकीय आणि आर्थिक लाभ मिळवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शिक्षक आमसिद्ध बिराजदार यांच्या विरोधात तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता. नोकरी मिळवते वेळी त्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे या तक्रारीत सांगण्यात आले होते. यावर पुरावा सादर करण्याची संधी देखील आमसिद्ध बिराजदार यांना देण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी चौकशी केली. त्यात ते दोषी आढळले असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मला आमसिद्ध बिराजदार यांच्या विरोधात तक्रार देण्यास प्राधिकृत करण्यात आले असल्याचे फिर्यादी दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement