(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Effect | कोरोनाच्या धास्तीचा शिवभोजन थाळीवर परिणाम, नागरिकांची शिवभोजन केंद्रांकडे पाठ
कोरोना व्हायरसचा परिणाम शिवभोजन थाळीवरही दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचे आवाहन केल्यानंतर धुळे शहरातील शिवभोजन थाळीलाच याचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे.
धुळे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावं, असं आवाहन केलं आहे. या आवाहनाचा फटका ठाकरे सरकारने सुरु केलेल्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेलाच बसताना दिसत आहे. लोकांनी शिवभोजन थाळी केंद्रावर जाणेही टाळलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाचा परिणाम धुळ्यात दिसू लागला आहे. धुळे शहरातील शिवभोजन थाळी केंद्राला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे. शिवभोजन थाळी केंद्र चालकांना ठरवून दिलेल्या टार्गेटनुसार सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व शिवभोजन केंद्र सुरु ठेवण्यात येत असतात. दुपारी 2 वाजेपर्यंत याआधी 150 शिवभोजन थाळ्या पूर्ण होत होत्या.
मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील शिवभोजन केंद्रावर नागरिकांनी पाठ फिरवली. 150 थाळी देखील पूर्ण होत नसल्याचं शिवभोजन थाळी केंद्र चालकाने सांगितलं. इतर शिवभोजन केंद्रांवरही अशीच स्थिती असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे लोकांनी कोराचा धसका घेतल्याचं स्पष्ट होतंय.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या 26 वर गेली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यापैकी पुण्यात- 10, मुंबई- 5, पनवेल- 1, कल्याण- 1, नवी मुंबई- 1, नागपूर- 4, ठाणे- 1, यवतमाळ- 2, अहमदनगर- 1 रुग्ण आढळले आहेत.
नव्या आकडेवारीनुसार एकूण 94 रुग्ण देशभरात आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्र 26, केरळ 19, हरियाणा 14 (सर्व परदेशी नागरिक), उत्तर प्रदेश 12, दिल्ली 7, कर्नाटक 6, राजस्थान 3, पंजाब 1, जम्मू काश्मीर 1, लडाख 3, तामिळनाडू 1, तेलंगणा 1 यांचा समावेश आहे.
कोरोनाचे देशात दोन बळी
भारतात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. काल दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. अहमदनगरमध्ये एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुंबईतही आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आता 4, पुण्यात 10, नागपुरात 3 तर ठाण्यात एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आता राज्यात एकूण 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
शहरी भागातील शाळा-महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद
राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याकाळात मंडळ परिक्षा सुरू राहतील, असं स्पष्ट करताना परीक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे. राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायिक, यात्रा, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं.
संंबंधित बातम्या :
- #CoronaVirus | कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार, शनिवारीच अधिवेशनाचा समारोप
- Coronavirus | पुण्यानंतर मुंबईत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण
- Corona Virus | असंवेदनशीलतेचा कळस, कोरोना पीडित रुग्णाच्या कुटुंबाला वाळीत टाकलं
- #CoronaVirus | महाराष्ट्रातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे