पंढपुरात प्रदक्षिणामार्गावर कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ! परिक्रमेत अडचण नसल्याचा प्रशासनाचा खुलासा
पंढपूरमध्ये प्रदक्षिणामार्गावर कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, आषाढी एकादशी दिवशी मानाच्या पादुकांच्या परिक्रमेत कोणतीही अडचण नसल्याचं प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
पंढरपूर : आषाढी यात्रा दोन दिवसांवर आली असताना आज सकाळी प्रदक्षिणामार्गावर एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, असे असले तरी एकादशीच्या दिवशी पादुकांच्या नगर प्रदक्षिणेला कोणतीही अडचण येणार नसल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. यंदा कोरोनाच्या संकटामुळे आषाढी यात्रा भरणार नसली तरी मानाच्या संत पादुका मात्र येणार आहेत. एकादशी दिवशी चंद्रभागेचे स्नान करुन मंदिराची नगरप्रदक्षिणा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. आज सकाळी नेमके प्रदक्षिणामार्गावर मार्गावर एक कोरोना रुग्ण आढळल्याने वरिष्ठ स्तरावर विचारविनिमय केल्यानंतर प्रदक्षिणेला अडचण नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आढावा
आषाढी यात्रेबाबत घोळ वाढतच चालला असून आता मानाच्या 9 संतांच्या पादुका विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने आणायच्या, याचा अद्याप निर्णय झाला नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पंढरपूरमध्ये सांगितले. दुपारी साडेचार वाजता येणारे गृहमंत्री पंढरपूरमध्ये रात्री नऊ वाजता पोहचले. उशीर झाल्याने मंदिराकडे न जात महाद्वार रोडवर उभे राहूनच त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडून उभ्या उभ्या यात्रेचे नकाशे बघितले. यावेळी बोलताना त्यांनी पादुका या 30 तारखेला पंढरपुरात येणार असून त्या 9 मठात पोहचतील. एकादशीला सकाळी या पादुकांना चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिणा घालण्यात येईल आणि द्वादशी म्हणजे दोन जुलै रोजी या पादुकांना मंदिरात आणून विठ्ठल दर्शन व देवाला नैवेद्य अर्पण करून सर्व पादुका पुन्हा संध्याकाळी परत फिरणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. दरम्यान आषाढी यात्रा काळात संचारबंदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला आहे. याबाबत शासन स्तरावर विचार होऊन निर्णय होईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
Coronvirus | कोरोनाग्रस्तांसाठी विठुराया आला धावून; पंढरपूर विठ्ठल मंदिराकडून 1 कोटी रुपयांची मदत
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचीही पंढपूरला भेट पंढरपूर शहरातील 5 कोटी रुपयांचे सीसीटिव्हीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आल्याचे सांगताना पोलीस निवासस्थानाचा असलेला 140 कोटींचा प्रकल्पही लवकरच सुरू करणार असल्याचे संकेत गृहमंत्र्यांनी दिले. यंदा कोविडचे संकट असून विठुराया ते दूर करेल तेव्हा पुढच्या वरील मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल. आता कळसाचेच दर्शन घेऊन समाधान मनात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. पंढरपुरात कोविड रुग्णालयाबाबत उपजिल्हा रुग्णालयात करण्याचे संकेत यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Coronavrius | पंढरपुरात प्रदक्षिणा मार्ग परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला