(Source: Poll of Polls)
Coronvirus | कोरोनाग्रस्तांसाठी विठुराया आला धावून; पंढरपूर विठ्ठल मंदिराकडून 1 कोटी रुपयांची मदत
राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत.
पंढरपूर : कोरोनाचे संकट वाढू लागले असताना आता विठूराया मदतीसाठी पुढे आला आहे. मंदिराकडून 1 कोटी रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस घोषित करण्यात आली आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी ही माहिती दिली. मंदिर समितीशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान 4 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा देखील रद्द केल्याची घोषणा मंदिराकडून करण्यात आली असून वारकरी संप्रदायाने यापूर्वीच यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली असतानाच देशभरात अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गर्दीची ठिकाण बंद करण्यात आली आहेत. अशातच राज्य शासनाने दिलेल्या सुचनेनुसार, पंढरपूर विठ्ठल रुक्माई मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय पंढरपूर देवस्थान विश्वस् मंडळाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या हितासाठी मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त आमदार राम कदम यांनी दिली होती.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं दिलेल्या सुचनेनुसार राज्यातील अनेक मंदिरं बंद करण्यात आली आहेत. त्यात तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, शेगावचं गजानन महाराज मंदिर, नृसिंहवाडीचं दत्त मंदिर, जेजुरीचं खंडोबा मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. तर शिर्डीचं साईबाबा मंदिरही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं आहे. त्याचबरोबर गणपतीपुळे, मुंबादेवी, परळी वैद्यनाथ मंदिरंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19, मदत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं आवाहन
कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोविड-19 (COVID- 19 ) या नव्या खात्याती निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे.
'उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात. त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी', असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मदत करण्यासाठी खात्याची सविस्तर माहिती :- मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
- खाते क्रमांक- 39239591720
- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
- शाखा कोड 00300
- आयएफएससी कोड SBIN0000300