Lockdown | दहावी, बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांना संचारबंदीत शिथिलता
दहावी - बारावीचे राज्य मंडळाचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी शिक्षकांना उत्तर पत्रिकांची ने आण करता येणे शक्य व्हावे यासाठी त्यांना संचारबंदीतून सूट देणे आवश्यक होते. त्या प्रकारची मागणी सुद्धा शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे केली होती.

मुंबई : मार्च महिन्यात 10 वी आणि 12 वी परीक्षा झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक शिक्षकांच्या दहावी - बारावीच्या अनेक उत्तरपत्रिका तपासणीविना शाळेत तर काही शिक्षकांकडे अडकून पडल्यात. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी झाल्याशिवाय बोर्डाचा निकाल जाहीर होणे शक्य नाही. शिवाय निकाल लागल्याशिवाय पुढील वर्षातील प्रवेश प्रक्रियाही पार पडू शकणार नाही. त्यामुळे दहावी - बारावीचे राज्य मंडळाचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी शिक्षकांना उत्तर पत्रिकांची ने आण करता येणे शक्य व्हावे यासाठी त्यांना संचारबंदीतून सूट देणे आवश्यक होते. त्या प्रकारची मागणी सुद्धा शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे केली होती.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी राज्यातील महानगरपालिकांच्या आयुक्तांना व सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राज्य मंडळाशी संबंधित सर्व अधिकारी , शिक्षक , नियामक, शिक्षकेतर कर्मचारी यांना विशेष विशेष उत्तरपत्रिका तपासणीच्या कामांकरिता पास देऊन प्रवासासाठी परवानगी देण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दहावी आणि बारावीचा निकाल 10 जून पूर्वी घोषित करणे आवश्यक आहे. यंदा बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान तर दहावीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च दरम्यान घेण्यात आली. मात्र संचारबंदीच्या काळामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात आली आणि वाहतूक व्यवस्था ही बंद झाली. त्यामुळे शिक्षकांना शाळेत येणे जाणे कठीण झाले. मात्र लॉकडाऊनचा वाढता कालावधी पाहता उत्तरपत्रिका तपासणी वेळेत न झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून संचारबंदीच्या काळात विशेष बाब म्हणून शिक्षकांना पास देऊन उत्तरपत्रिका ने आण करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हा प्रवास करताना संबंधीतानी मंडळाचे लेखी आदेश व स्वतःचे ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहणार आहे. यामुळे नऊ विभागातील उत्तरपत्रिका तपासणीसाठी संबंधित अधिकाऱ्याना प्रवास करता येणे शक्य होणार आहे. तसेच यासाठी सार्वजनिक व खाजगी वाहनांचा वापर करता येणार असून त्याचा तपशील आवश्यक असल्यास मंडळालाही सादर करणे आवश्यक असणार आहे.
कशासाठी शिक्षक करू शकणार प्रवास
उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावरून किंवा पोस्टातून शाळा किंवा महाविद्यालयाकडे पाठवण्यासाठी
शिक्षक अथवा शिपायांमार्फत उत्तरपत्रिका शाळेतून परीक्षकांच्या घरी घेऊन जाणे
परीक्षकांकडून नियामकाकडे उत्तरपत्रिका पोहचवणे
नियमाकांकडील उत्तरपत्रिका संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करणे
परीक्षेतील गैरमार्ग प्रकरणी चौकशी करण्यासाठी नियुक्त अधिकार्यांनी प्रवास करणे
संबंधित बातम्या :





















