(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुतासारखं सरळ करायला निवडणूक लढवत आहे: अभिजित बिचुकले
विठुरायाच्या नगरीची नेत्यांनी केलेली दुरवस्था बघवत नाही आणि राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी पंढरपूर पोट निवडणूक लढवत असल्याचं अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी सांगितलं.
पंढरपूर : कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे तसेच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आता पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुतासारखं सरळ करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलंय.
विठुरायाच्या नगरीची नेत्यांनी केलेली दुरवस्था बघवत नाही आणि राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी पंढरपूर पोट निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करत असल्याचे अभिजीत बिचुकले यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. मंगळवेढा येथील पाणीप्रश्न आजवर कोणीच का सोडवला नाही असा सवाल करत आपण या निवडणुकीत निवडून येणार असा विश्वासही अभिजीत बिचुकले यांनी व्यक्त केला.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पंढरपूरची विधानसभा पोटनिवडणूक या दोन तरुण नेत्यांमध्ये होणार आहे. त्यात आता अभिजीत बिचुकले यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.
वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत. आपल्या वेगवेगळ्या स्टंट आणि वक्तव्याने ते कायम चर्चेत असतात. खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानी निवडणुकीच्या माध्यमातून अनेकदा खुलं आव्हान दिलं आहे. अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी बिचुकले यांना अद्याप यश आलेलं नाही. '2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार', असं बेधडक वक्तव्यही त्यानी केलं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल करत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली होती.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांच्या पत्नीचं मतदार यादीत नाव होतं पण त्यांच नाव गायब होतं. त्यावरुन गोंधळ घालत त्यांनी थेट निवडणूक आयोगावरच टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या :