पंढरपूर पोटनिवडणूक; समाधान अवताडेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नेत्यांची फौज येणार
कोरोना असतानाही नेत्यांच्या गर्दीत अवताडे यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे. भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे यावरून दिसत आहे.
पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आज उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवशी भाजप उमेदवार समाधान अवताडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप व मित्र पक्षांच्या नेत्यांची फौज पंढरपूरमध्ये सकाळी येणार आहे. कोरोना असतानाही नेत्यांच्या गर्दीत अवताडे यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे. भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे यावरून दिसत आहे. आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विजयसिंह मोहिते पाटील यांचेसह आमदार विनायक मेटे, गोपीचंद पडळकर, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, खासदार रणजित निंबाळकर व खासदार जय सिद्धेश्वर स्वामी उपस्थित राहणार आहेत.
आज सकाळी साडे अकरा वाजता ही उमेदवारी दाखल होण्याची शक्यता असून जेथे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता, त्याच श्रीयश पॅलेसमध्ये भाजप नेते 200 प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी कोरोनाचे नियम पळत सोशल डिस्टन्स पळाले जाणार असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचाही उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान अवताडे या दोन तरुण नेत्यांमध्ये लढत होणार आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हे कला शाखेतील पदवीधर असून केवळ 34व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भगीरथ हे गेली 10 वर्ष वडिलांना राजकीय कामकाजात मोठी मदत करत होते. त्यामुळे त्यांना निवडणुकांचा चांगला अनुभव आहे. गेली 10 वर्षे ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक असून वडिलांच्या निधनानंतर त्यांची साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भगीरथ भालके यांनी गेल्या वेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कासेगाव गटातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
भाजपचे उमेदवार समाधान अवताडे हे भगीरथ भालके यांच्या तुलनेत थोडे जास्त अनुभवी आहेत. त्यांनी यापूर्वी दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. अवताडे हे 45 वर्षांचे असून सिव्हिल इंजिनियर आहेत. तसे अवताडे यांना कोणती राजकीय पार्श्वभूमी नसली तरी तरुणांमध्ये ते खूप लोकप्रिय आहेत. अवताडे हे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. शेकडो किलोमीटरचे रस्ते बांधायची कामे त्यांच्या कंपनीकडे आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये सलग पराभव होत असताना अवताडे यांच्या मतांमध्ये चांगली वाढ झालेली आहे. अशातच 80 हजार मतांचा गठ्ठा असणारे परिचारक यांचेवर अवताडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. त्यामुळे अवताडे यांच्यासाठी तशी ही निवडणूक सोपी बनली आहे.