मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराला काँग्रेसच्या महिलेचं आव्हान; बुलढाणा विधानसभा मतदारसंघात वातावरण तापलं
Maharashtra Politics : आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिलेदार संजय गायकवाड यांना काँग्रेसच्या राज्य सचिव असलेल्या ॲड. जयश्री शेळके (Jayshree Shelke) यांनी आतापासूनच आव्हान दिले आहे.
Buldhana News बुलढाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची (Buldhana Vidhansabha Constituencies) निर्मिती 1962 साली झाली. त्यानंतर जवळपास आठ वेळा काँग्रेस (Congress) तर पाच वेळा शिवसेनेने(Shiv Sena) या विधानसभा मतदारसंघात वर्चस्व गाजवलं. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्यांदा नशीब आजमावणाऱ्या लोकप्रतिनिधींना या मतदारसंघाने स्पष्ट नाकारलं आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) करत आहेत. गायकवाड हे तसे आधी छावा संघटना, मनसे आणि त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करून लोकप्रतिनिधी झालेले आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ देण्याचा ठरवलं. आता आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या या शिलेदाराला काँग्रेसच्या राज्य सचिव असलेल्या ॲड. जयश्री शेळके (Jayshree Shelke) यांनी आतापासूनच आव्हान दिलेल आहे.
महाविकास आघाडीकडून जयश्री शेळके या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. तर त्यांनी आतापासूनच मतदारसंघात भेटीगाठी, कॉर्नर सभा घेण्याचा सपाटा सुरू केलाय. पक्षाने तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी जयश्री शेळके या विधानसभा लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्या समोर आतापासूनच आव्हान दिल्या जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार?
विदर्भातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा राहिलेल्या बुलढाण्यात विधानसभेचे एकूण सात मतदारसंघ आहेत. या सात मतदारसंघांमध्ये मलकापूर, मेहकर, बुलढाणा, अमळनेर, चिखली, जळगाव जामोद आणि सिंदखेड राजा या मतदारसंघांचा समावेश आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील पाच मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले होते. तर उर्वरित दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी आमदार निवडून आला होता. मात्र, सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे बुलढाणा जिल्ह्यात यंदा विधानसभा निवडणुकीच्यावेळी रंगतदार चित्र पाहायला मिळणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील आमदारांची यादी (Buldhana MLA List)
- मलकापूर विधानसभा - राजेश एकाडे (काँग्रेस)
- बुलढाणा शहर विधानसभा - संजय गायकवाड (शिवसेना - शिंदे गट)
-चिखली विधानसभा - श्वेता महाले (भाजप)
-सिंदखेड राजा विधानसभा - राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- मेहकर विधानसभा - संजय रायमूलकर (शिवसेना शिंदे)
- खामगाव विधानसभा - आकाश फुंडकर (भाजप)
- जळगाव जामोद विधानसभा - संजय कुटे (भाजप)
इतर महत्वाच्या बातम्या