Ramtek Lok Sabha : रामटेकची जागा शिवसेनेकडून काँग्रेसने खेचली, रश्मी बर्वे विदर्भात विजयी झेंडा फडकवणार?
रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी अखेर रश्मी बर्वे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. मविआमध्ये रामटेकच्या जागेवरून होत असलेल्या चढाओढीत ही जागा काँग्रेसला आपल्या पारड्यात पाडून घेण्यात काँग्रेसला यश आलय.
Ramtek Lok Sabha Election: रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी अखेर रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. महाविकास आघाडीमध्ये रामटेकच्या जागेवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना आणि काँग्रेसमधील (Congress) चढाओढीत ही जागा काँग्रेसला आपल्या पारड्यात पाडून घेण्यात काँग्रेसला यश आले आहे. त्यामुळे अनेक अडथळ्यांची खिंड भेदत सरतेशेवटी रश्मी बर्वे निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत.
गेल्याकाही दिवसांपूर्वी रश्मी बर्वे यांच्या जातप्रमाणपत्र प्रकरणी संशयाची सुई होती. मात्र आयुक्तांनी आपला आदेश मागे घेतल्याने उच्च न्यायालयाने रश्मी बर्वे यांच्या विरोधातील याचिका निकाली काढली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने बर्वे यांना दिलासा दिल्याने त्यांचा रामटेकमधून लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता अर्धी शर्यत संपली असली तरी रामटेकच्या गडवर काँग्रेसला आपली विजयी पताका रोवण्यात यश येतं का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
रश्मी बर्वे विदर्भात विजयी झेंडा फडकवणार?
काँग्रेस पक्षाची देशातील उमेदवारांची चौथी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील उमेदवारांच्या या दुसऱ्या यादीत नागपूरात नितीन गडकरी विरोधात विकास ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी डॉ. नामदेव किरसान यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. यासह भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर हे लोकसभा मतदारसंघही काँग्रेसकडे गेले आहे. काँग्रेसने भंडारा-गोंदिया मतदारसंघातून डॉ. प्रशांत पडोळे यांनी संधी दिली आहे. तर रामटेक मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेसच्या शर्यतीत ही जागा काँग्रेसने खेचली असून या जागेवर अखेर रश्मी बर्वे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
कोण आहेत रश्मी बर्वे?
रामटेक काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे या माजी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्या पारशिवनी तालुक्यातील टेकाडी जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्य असून याच टर्ममध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आरूढ होताच बर्वे या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आल्या. 2012 मध्येही त्या काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढल्या होत्या. मात्र तेव्हा त्यांचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला होता.
असे असले तरी रश्मी बर्वे यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत जिल्ह्याच्या नागरिकांसाठी चांगले निर्णय घेतले. यात अनेक उपक्रम आणि स्थानिकांचे मन जिंकण्यात कसोशीने प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांचे स्थानिकांमध्ये बरेच नाव चर्चेत होते. त्यावरून सुनील केदार गटाकडून बर्वे यांचे नाव वर्षभरापूर्वीच रामटेकच्या उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले होते. अलीकडे या मागणीच जोर वाढला असता काँग्रेस पक्षश्रेष्ठींना याबाबत सकारात्मक विचार करत अखेर रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या