(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrapur Lok Sabha Election: ज्या चंद्रपूरने काँग्रेसची 2019 मध्ये लाज राखली तिथलाच उमेदवार ठरेना; नेमका वाद आहे तरी काय?
Chandrapur: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. 2019 मध्ये ज्या चंद्रपूरने काँग्रेसची लाज राखली तिथलाच उमेदवार अद्याप ठरत नसल्याने अनेक चर्चा आणि तर्कवितर्कांना उत आला आहे.
Congress Second List In Maharashtra: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा काँग्रेस (Congress) पक्षाची देशातील उमेदवारांची चौथी यादी (Congress Candidate List) जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील उमेदवारांची (Maharashtra Congress Candidate List) ही दुसरी यादी आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या या दुसऱ्या यादीत विदर्भातील (Vidarbha) विकास ठाकरे, रश्मी बर्वे, डॉ. प्रशांत पडोळे आणि डॉ. नामदेव किरसान या चार नेत्यांना उमेदवारी देण्यात आली. असे असले तरी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाचा (Chandrapur Lok Sabha) तिढा अद्याप सुटलेला नाही.
त्यामुळे 2019 मध्ये ज्या चंद्रपूरने काँग्रेसची लाज राखली तिथलाच उमेदवार अद्याप ठरत नसल्याने अनेक चर्चा आणि तर्कवितर्कांना उत आला आहे. या मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह (Vijay Wadettiwar) त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) इच्छुक आहेत, तर दुसरीकडे प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी देखील जोरदार तयारी केली असून त्यांनी या मतदारसंघावर आपला वेळोवेळी दावा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी पक्षांतर्गत होत असलेली रस्सीखेच बघता काँग्रेस पक्षश्रेष्ठींना हा तिढा सोडवणे फार आव्हानात्मक ठरत आहे का, असा प्रश्न या उपस्थित केला जात आहे.
चंद्रपूरने लाज राखली तिथलाच उमेदवार ठरेना
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये काँग्रेस दिवंगत नेते बाळू धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवत एकप्रकारे राज्यात काँग्रेसची लाज राखली होती. मात्र त्यानंतर खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. त्यामुळे आता या मतदारसंघावर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी आपला दावा केला असून परंपरागत ही जागा आपल्यालाच सुटावी यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे साकडे घातले आहे. दुसरीकडे राज्यातील काँग्रेसमधली हेवीवेट नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यादेखील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीपर्यंत चांगलीच फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. मात्र, याठिकाणी प्रतिभा धानोरकर यांनाच उमेदवारी द्यावी, असा सूर स्थानिक पातळीवर दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसला हा पेच सोडवणे अधिक जिकरीचे ठरत असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांच्या मुलीला संधी दिली जाते, की प्रतिभा धानोरकर यांची वर्णी लागते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्याची अधिसूचना लागू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरूवात झाली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडी आणि काँग्रेसमधली उमेदवार अद्याप ठरत नसल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे वडेट्टीवार आणि धानोरकर समर्थकांमध्ये चांगलीच चढाओढ लागली असून त्याला आता वादाची किनार देखील लाभली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या