(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊनमुळे मुलं परराज्यात; मुलांच्या अनुपस्थितीत पतीच्या मृतदेहाला मुखाग्नी
मुले परराज्यात अडकल्याने मृत पतीला मुखाग्नी देण्याची वेळ वृद्ध महिलेवर आली आहे. सोलापूरमधील ही घटना आहे.
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन जनहिताता असला तरी अनेकांना अनेक अडचणीचा सामना यामुळे करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे मुलं दुसऱ्या राज्यात अडकल्याने सोलापुरातील एका वृद्ध महिलेला आपल्या पतीच्या मृतदेहाला मुखाग्नी द्यावा लागला आहे.
सोलापुरातील घरकूल परिसरात राहणाऱ्या 75 वर्षीय व्यंकटय्या राजमल्लू वोद्दूल यांचे 1 एप्रिल रोजी रात्री निधन झाले. 2 एप्रिल त्यांचे अंतिम संस्कार पार पडले. मात्र या लॉकडाऊनमुळे मुलांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे वृद्ध पत्नी श्यामलव्वा व्यंकटय्या वोद्दूल यांनी आपल्या पतीला मुखाग्नी द्यायचा निर्णय घेतला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनमुळे फक्त राज्याच्याच नाही, आंतरजिल्हा सीमाही सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक लोकांना वेगवेगळ्या अडचणींना देखील सामोरे जावं लागत आहे. सोलापुरातील व्यंकटय्या राजमल्लू वोद्दूल यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. तेलंगाणामध्ये नाभिक व्यवसाय करणारी त्यांची तिन्ही मुलं लॉकडाऊनमुळे तिथेच अडकली.
मुलं अंत्यसंस्कार करण्यासाठी उपस्थित राहू शकणार नसल्याने मुखाग्नी कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अखेर मृत व्यक्तीच्या पत्नीनेच आपल्या वृद्ध पतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. वोद्दूल दाम्पत्याची मुले बालराज, कृष्णा, अनिल आणि सुनांनी तेलंगणातून व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून आपल्या पित्याचा अखेरचा निरोप घेतला.
संबंधित बातम्या