समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
Suhas Kande vs Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा भुजबळ आणि कांदे आमने-सामने आल्याचे दिसून येत आहे.
नाशिक : एकीकडे महायुतीत (Mahayuti) सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून (Nashik Guardian Minister) महायुतीतील नेत्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पालकमंत्रिपदासाठी आग्रही असतानाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांकडून सुहास कांदे भावी पालकमंत्री असे बॅनर लावले. यामुळे पालकमंत्रिपदावरून सुहास कांदे आणि भुजबळ वादाचा नवा अंक सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सत्ता स्थापनेच्या आधीच नाशिकमध्ये पालकमंत्रिपदावरून बॅनरबाजी सुरु आहे. एकीकडे सुहास कांदे यांच्या समर्थकांकडून बॅनर झळकले असतानाच छगन भुजबळांचा भावी पालकमंत्री, अशा आशयाचा नाशिक शहरात बॅनर लागला. तसेच छगन भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री व्हावे, यासाठी युवक राष्ट्रवादीने काल महादेव मंदिरात दुग्ध अभिषेक केला होता.
पालकमंत्रिपदावरून कांदे-भुजबळ वादाचा नवा अंक
भुजबळ आणि कांदे यांचे बॅनर झळकल्याने नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा भुजबळ आणि कांदे आमने-सामने आल्याचे दिसून येत आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये आपल्याच नेत्याला पालकमंत्रीपद मिळावे यासाठी संघर्ष पाहायला मिळत आहे. सुहास कांदे यांनी छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केल्यानंतर कांदे यांचे पुढचे टार्गेट छगन भुजबळ आहे का? पालकमंत्री पदावरून सुहास कांदे आणि भुजबळ वादाचा नवा अंक पाहायला मिळणार का? अशा चर्चांना नाशिकमध्ये उधाण आले आहे.
देवयानी फरांदेंचेही झळकले बॅनर
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे या तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे वसंत गीते यांचा देवयानी फरांदे यांनी पराभव केलाय. यानंतर आता देवयानी फरांदे यांचे भावी पालकमंत्री असे बॅनर दिसून आले आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे यांचे नाव चर्चेत असतानाच देवयानी फरांदे यांचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. आता देवयानी फरांदे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार का? नाशिकच्या पालकमंत्रीपदी कोणाची निवड होणार? याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा