Chhagan Bhujbal : मंत्रिपदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
Chhagan Bhujbal : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झाले तरी देखील राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेले नाही.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसलाय. सध्या महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु असून कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार याबाबत जोरदार चर्चा रंगल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्रीपदावरून मोठं वक्तव्य केलंय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झाले तरी देखील राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या शपथविधीला देखील उशिर होत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता छगन भुजबळ यांनी महायुतीत शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट अधिक असल्याचं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेइतकीच मंत्रीपदं आम्हाला मिळावी : छगन भुजबळ
नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवार यांच्या सोबत आमची बैठक झाली. त्या बैठकीत स्ट्राइक रेटबाबतचा विषय निघाला. राज्यात एक नंबर भाजप आहे तर दोन नंबरला आम्ही आहोत आणि तीन नंबरला शिंदेंची शिवसेना आहे. त्यामुळे स्ट्राइक रेट चांगला असून शिवसेनेइतकीच मंत्रीपदं आम्हाला मिळावीत, अशी मागणीत त्यांनी केली. तर राज्याच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का? असे विचारले असता नवीन चेहऱ्यांना नेहमी संधी देण्यात येते. यावेळी जरा अडचण जास्त आहेत, दर वेळी 160 आमदार असतात, यावेळी जास्त आमदार आहेत. सर्व पक्षांमध्ये नवीन जुने चेहरे येतील, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
अजित दादा फोन करून सांगतील तेव्हा...
दोन दिवसात मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. काही संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातून छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ यांचे नाव आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, हे मी तुमच्याकडून ऐकतोय. मला देखील काही जणांनी नाव पाठवलेत पण हे सगळं अंदाज आहेत. आमचे नेते अजित दादा आहेत, ते स्वतः फोन करून सांगतील तेव्हा ते खरं आहे. आमचे प्रांत अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष दिल्लीमध्ये आहेत. त्यांना इकडे बोलावण्यापेक्षा दादा दिल्लीला गेले आहेत, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा