(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lockdown | सांगलीतील मिरजेत लॉकडाऊनमध्येही सामूहिक नमाज पठण, 41 जण ताब्यात
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना या मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 41 जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सांगली : नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन मरकझ प्रकरण ताजे असताना मिरजेतील मटण मार्केट येथील बरकत मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठण सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना या मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 41 जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही मशीद पोलिसांनी सील केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी या 41 जणांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. तसंच मिरजमधील मुख्य मौलानाकडून या 41 जणांचे काऊन्सिलिंग सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मंदिरं, मशिदींमध्ये होणारे धार्मिक विधीही बंद करण्यात आले आहेत. दोनच दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे हजरत निजामुद्दीन दर्ग्यात मरकज या धार्मिक कार्यक्रमानिमित्त हजारो मुस्लीम एकत्र आले होते. मरकजमध्ये सामील झालेले मुस्लीम देशातील विविध राज्यात विस्तारले असल्याने सरकारसमोर कोरोना संसर्ग वाढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. कोणत्याही धार्मिक विधी, कार्यक्रमासाठी कोणत्याही समाजाने एकत्र येऊ नये, कार्यक्रम रद्द करावेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
असे असताना शुक्रवारी (3 एप्रिल) शहरातील मटण मार्केटजवळ बरकत मशिदींमध्ये 41 हून अधिक मुस्लीम एकत्र येऊन नमाजपठण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत तेथे नमाज पठणाऱ्या मुस्लिमांना ताब्यात घेतले. यावेळी 30-35 जणांनी पळून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना पकडले.
गडहिंग्लज मशिदीत सामूहिक नमाज पठाण तर दुसरीकडे गडहिंग्लजमध्ये मशिदीत सामूहिक नमाज पठणासाठी जमलेल्यांना ताब्यात घेतलं आहे. मशिदीच्या समोरच्या दरवाजाला कुलूप लावून मागील दरवाजाने प्रवेश केला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच कारवाई केली. त्यापैकी अनेकजण पळून गेले तर उर्वरित नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Nizamuddin Markaz | निजामुद्दीनऐवजी वसईत होणार होता तब्लिकींचा कार्यक्रम; महाराष्ट्र पोलिसांनी नाकारली परवानगी