मुख्यमंत्र्यांचा आज सौलापूर दौरा, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार
विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले असून सोलापुरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी ते करणार आहेत.

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्याला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री आज परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या नुकसानीची पाहणी करतील. तर उद्या त्यांचा मराठवाडा दौरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मदत जाहीर करणार का याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालं. जीवितहानी झाली असून जनावरंही दगावली आहे.
पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दरम्यान, त्याआधी विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता मुख्यमंत्री दौऱ्यावर येत आहेत.
परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
कसा असेल मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा? - सकाळी 09:00 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण - सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे) , सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा - सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण, सकाळी 11:30 वा. अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, - सकाळी 11:45वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण, - दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी - दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण, - दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी, - दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण, - दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी व नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण
शरद पवार आज परांडामध्ये पाहणी करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्यासाठी आणि शेतकऱ्याला आधार देण्यासाठी शरद पवार मराठवाड्याचा दौरा करत आहेत. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद इथे पवार पाहणी करणार आहेत. आज परांडामधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा शरद पवार घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचा तीन दिवसीय दौरा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील आजपासून तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते 9 जिल्ह्यात 850 किमी प्रवास करुन अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. आज ते पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेणार असून नुकसानी पाहणी करणार आहे. विशेष म्हणजे पवारांचा गड असलेल्या बारामतीपासून ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा या ठिकाणी दौरा करुन उस्मानाबादकडे रवाना होणार आहेत.
#MahaFloods सोलापूरमध्ये ऊस झोपला, बागा कोलमडल्या, सोयाबीन उद्ध्वस्त..नवदाम्पत्याचा संसारही पाण्यात























