कांदा निर्यात बंदी ही केंद्र सरकारची चूक, उदयनराजे भोसले यांचा सरकारला घरचा आहेर
केंद्र सरकारने कांदा निर्याती बंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. त्याबाबतचं पत्रक त्यांनी काढलं आहे.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले कोणत्याही पक्षात असोत ते कायमच आपल्या भूमिकांवर ठाम असतात. राष्ट्रवादीत असतानाही त्यांनी अनेकदा पक्षाला घरचा आहेर दिला होता. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून आजपर्यंत त्यांनी पक्षविरोधी वक्तव्य केलं नव्हतं. मात्र आता त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आवाज उठवताना थेट मोदी सरकारच्याच निर्णयाचा विरोध केला आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्याती बंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्याबाबतचं पत्रक त्यांनी काढलं आहे. कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा असल्याचा पत्रकात त्यांनी स्पष्ट उल्लेख करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. कांदा निर्यात बंदीच्या निर्णय चुकीचा असल्याचं सांगताना याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
शेतकरी लॉकडाऊनमुळे बॅकफुटवर गेला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यात बंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणखी संकटात नेणारा आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किंमतीच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पत्रकात केली आहे.
कांद्याचे उत्पादन करणारा शेतकरी हा गरीब आहे. कोरोनाकाळात संपूर्ण देशाला सावरण्याचे काम शेतकऱ्यांनी केले आहे. संपूर्ण देशाला अन्नधान्य आणि भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. आज जगभरातून कांद्याला मोठी मागणी आहे. अशावेळी निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. जेव्हा भाव कोसळतात तेव्हा कांदा फेकून द्यावा लागतो. पण आज कांद्याला चांगला भाव मिळत असताना, असा निर्णय घेणे यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी त्वरीत मागे घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली.
या निर्णयाबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी आपण चर्चा करणार असून आधीच लॉकडाऊच्या संकटातून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असताना ही अचानक केलेली निर्यात बंदी शेतकऱ्यांसाठी घातक ठरेल. आणि त्यांचे मोठे नुकसान होईल याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी त्यांनी केली.
- Onion Export Ban | केंद्राच्या आकस्मिक निर्णयामुळे भारताची बेभरवशाचा देश अशी प्रतिमा बनेल : शरद पवार
- कांदा निर्यात बंदीविरोधात शेतकऱ्यांचा रास्तारोको; राजकीय नेत्यांचाही विरोध
Onion Export Ban | केंद्राच्या आकस्मिक निर्णयामुळे भारताची बेभरवशाचा देश अशी प्रतिमा बनेल : शरद पवार