Chandrakant Patil : उद्धव ठाकरेंनी महागाईवर भाषण देण्यापेक्षा पेट्रोल डिझेलवरील कर कमी करावेत, चंद्रकांत पाटलांची मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महागाईवर भाषण देण्यापेक्षा मोदी सरकारप्रमाणे पेट्रोल डिझेलवरील कर कमी करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
![Chandrakant Patil : उद्धव ठाकरेंनी महागाईवर भाषण देण्यापेक्षा पेट्रोल डिझेलवरील कर कमी करावेत, चंद्रकांत पाटलांची मागणी Bjp Leader Chandrakant Patil criticism on State Govt on Petrol Diesel Price Chandrakant Patil : उद्धव ठाकरेंनी महागाईवर भाषण देण्यापेक्षा पेट्रोल डिझेलवरील कर कमी करावेत, चंद्रकांत पाटलांची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/24/77902dbb1741f625eacdafdc0cd28683_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chandrakant Patil : केंद्र सरकारनं इंधनांच्या अबकारी करात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) लागू करण्यात आले. या निर्णयांमुळे निश्चितच देशातल्या जनतेला दिलासा मिळणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. या निर्णयाबाबत चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांचे आभार मानले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महागाईवर भाषण देण्यापेक्षा मोदी सरकारप्रमाणे पेट्रोल डिझेलवरील कर कमी करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील अकबारी कर कमी करुन देशातील जनतेला दिलासा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी जनतेच्या भल्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनेही कर कमी करावे अशी विनंती पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतील देशातील नऊ कोटी गॅस ग्राहक महिलांना बारा सिलिंडरपर्यंत प्रती सिलिंडर दोनशे रुपये सबसिडी जाहीर केली आहे. तसेच सिमेंट आणि स्टीलच्या आयातीवरील कर कमी केला आहे तर निर्यातीवरील कर वाढवला आहे. परिणामी सिमेंट आणि स्टीलचे दर कमी होतील. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्यासोबतच मोदी सरकारच्या निर्णयांमुळे देशातील महागाई कमी होण्यास मदत मिळेल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
मोदी सरकारने नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलवरील कर पाच रुपये तर डिझेलवरील कर 10 रुपये कमी केला होता. त्यामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. यानंतर देशभरातील 22 राज्यांनी त्या त्या राज्यात इंधनावरील कर कमी केल्यामुळे तेथील जनतेला आणखी दिलासा मिळाल्याचे पाटील म्हणाले. परंतू, महाराष्ट्रात मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्यास नकार दिला. महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांमध्ये लोकांना पेट्रोल डिझेल स्वस्त मिळते पण महाराष्ट्रात दिलासा नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मोदी सरकारने दुसऱ्यांदा इंधनावरील कर कमी केल्यानंतर राज्य सरकारने देखील जनतेला दिलासा द्यायला हवा, कर कमी केले पाहिजे असे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)