Ajit Pawar: दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
Ajit Pawar: कर्जमाफीबाबत आम्ही जूनमध्ये ठरवणार आहे. आम्ही जाहीरनाम्यात दिलं असल्याने हे आम्ही करू. पण हे सारखं सारखं होणार नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne), कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांसह उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते कारखान्याच्या गव्हाणीचे पूजन करून मोळी टाकण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवारांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, काही कारखाने 15 तारखेपासून सुरू केले आहेत, त्यांना नोटीस दिली आहे. हे सर्वांचे सरकार आहे, 32 हजार कोटीचे पॅकेज दिले आहे, इतिहासात कधी एवढं पॅकेज दिल नव्हते. अजूनही राज्याच चार पाच दिवस पाऊस राहील असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी एवढा पाऊस बघितला आहे का? मदतीसाठी आम्ही पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांशी बोलतो आहे.
Ajit Pawar: भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी
कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, दत्तात्रय भरणे यांनी जमीन घेतली आहे, मला येताना म्हणतोय की दादा इथं जमीन घेतली. पण मला वाटलं होतं रस्ता वाढेल. पण, इथे उड्डाणपूलच आला आणि कुठे कुठे जमिनी घेतल्यात हे आम्हाला बरं कळलं नाही. ती दूरदृष्टी आम्हाला पण द्या, असं म्हणत अजित पवारांनी मिश्कील टिपण्णी केली.
Ajit Pawar: सगळी सोंग करत येतात पैशाचे सोंग करता येत नाही
पुढे अजित पवार म्हणाले, लाडक्या बहिणींना 45 लाख कोटी जातात, 25 कोटी महावितरणला द्यायचे आहेत. 1 लाख कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांना द्यावे लागतात. मी भाषणात सांगितले सगळी सोंग करत येतात पैशाचे सोंग करता येत नाही यावरून माझ्यावर टीका होते. काहींनी तर पुरुष असून पण लाडक्या बहिणीचा लाभ घेतला. ज्याला गरज आहे त्याच्या खात्यात पैसे दिले पाहिजेत ही काळाची गरज आहे असं वक्तव्य देखील अजित पवारांनी केलं आहे.
Ajit Pawar: काहींनी तर आंबा खाल्लं की पोर...
जमिनीत वाटण्या होऊ लागल्या त्याच्यामुळे जमीन कमी होऊ लागली, काही तर आता भूमिहीनच होतील. त्याच्यामुळे पलटण कमी करा. आम्ही निवडणुकीला उभं राहायचं असेल तर दोनच आपत्य असेल असं धोरण आणलं. मात्र आम्हाला ते आणखी कडक करायचं होतं. ज्याला दोन पेक्षा जास्त अपत्याचे त्याला सरकारी कोणतीच योजना द्यायची नव्हती असं आमचं करायचं चाललं होतं. देवाची कृपा म्हणून असं करू नका. काय खाल्ल्यावरती काय होतं आपल्याला माहिती आहे. काहींनी तर आंबा खाल्लं की पोर होतात म्हणून सांगितले होतं, असंही अजित पवार मिश्कीलपणे म्हणालेत.
Ajit Pawar: कर्जमाफीबाबत आम्ही जूनमध्ये ठरवणार
कर्जमाफीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, कर्जमाफीबाबत आम्ही जूनमध्ये ठरवणार आहे. आम्ही जाहीरनाम्यात दिलं असल्याने हे आम्ही करू. पण हे सारखं सारखं होणार नाही. यामध्ये राजकारण आम्ही करणार नाही असंही पुढे ते म्हणालेत.
Dattatray Bharne: हा शेतकरी तुम्हाला कधीही विसरणार नाही- दत्तात्रय भरणे
याच कार्यक्रमावेळी बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी रात्री कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे हा शेतकरी तुम्हाला कधीही विसरणार नाही. दादा तुम्ही काल कर्जमाफी केली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होतेच पण कृषिमंत्री म्हणून माझी पण नोंद राहील. आज शेतकरी अडचणीत आहे. गेली सहा महिने राज्यात अतिवृष्टी होत आहे. काही भागात शेतकऱ्याच्या पिकाचे खूप नुकसान झाले आहे. 2 कोटी एकर पेक्षा जास्त शेती पिकाचे नुकसान झाले आहे.
त्या शेतकऱ्यांना मदत करणे आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासाठी काम करत आहेत. मी स्वतःला भाग्यवान समजतो या छत्रपती कारखान्याने मला संचालक केले, चेअरमन केले, या खुर्चीने एवढे शिकवले आहे की, कोणी काही म्हणाले तरी काही वाटत नाही. दादा देखील या कारखान्यात संचालक झाले आहेत. या कारखान्याने, मातीने आम्हाला घडवले आहे याची जाण आहे. भविष्यात या कारखान्यासाठी जे करता येईल ते करील, असंही पुढे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.
Dattatray Bharne: कर्जमाफीची जी घोषणा केली तुम्हाला माणसं आयुष्यभर विसरणार नाहीत
राज्याचे आणि केंद्राच्या कृषी खात्याच्या अनेक योजना आहेत, राज्याला तर फायदा मिळालाच पाहिजे, पण आपल्या भागासाठी कसा चांगला फायदा होईल यासाठी प्रयत्न असेल. या भागातील एखादं घर नसेल जी मागील पंढरवड्यापूर्वी यंत्रीकरणची जी योजना जाहीर केली त्याचा लाभ मिळाला नाही. दादा तुम्ही मला जो विभाग दिला किंवा पद दिलं त्याचा उपयोग या शेतकऱ्यांसाठी होतो, त्याच रात्रीच उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री तर होतेच पण दादांनी जी काल कर्जमाफीची जी घोषणा केली तुम्हाला माणसं आयुष्यभर विसरणार नाहीत.अडचणीच्या काळात खूप मोठं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. तुम्ही तिघांनी कर्जमाफी तर केलीच पण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे असताना केली याचा आनंद आहे.
Dattatray Bharne: छत्रपती कारखाना काटा करण्याचे पाप कधी करणार नाही...
ऊस कमी असताना आपल्याकडे सगळी येतील पण जास्त असताना कोणी येणार नाही. त्यामुळे आपल्या भागातील जे आहे ते जपा.
छत्रपतीच्या सभासदांनी वातावरण हलकं फुलकं ठेवा. श्री छत्रपती साखर कारखान्याचा ऊसाचा दर निश्चित प्रकारे चांगला राहील हा शब्द देतो. छत्रपती कारखाना काटा करण्याचे पाप कधी करणार नाही, असंही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.
























