शेअर मार्केटमधील मुलाची गुंतवणूक जीवावर बेतली, सावकारांच्या कर्जामुळे सांगलीत कुटुंबाची आत्महत्या
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रचंड कर्ज झाल्याने मिरज, बेळंकीतील मालमत्ता विकली तरीही अद्याप दीड कोटी देणे होते. त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
सांगली : कर्जाला कंटाळून मिरजेच्या बेळंकी येथे एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी व एका मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी मुलाने सावकारांकडून कर्ज घेतले आणि शेअर मार्केटमधून अपेक्षित पैसे न मिळाल्याने हे गवाणे कुटूंब संकटाच्या खाईत अडकले. मग ज्या सावकरांकडून पैसे घेतले होते त्याचा तगादा सुरू झाला आणि हा त्रास सहन न झाल्याने वडील, आई आणि त्या मुलाने मृत्यूलाच कवटाळले. सेवानिवृत्त पोलीस अण्णासो गुरसिद गव्हाणे, पत्नी मालन अण्णासो गव्हाणे आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी या आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
मिरज तालुक्यातील बेळंकी गावात जिल्हा पोलीस दलातील निवृत्त कर्मचाऱ्याने मुलगा, पत्नीसह आत्महत्या केल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा आकडा कोट्यवधीच्या घरात गेल्याने आणि सावकाराचा कर्जवसुलीसाठी तगादा मागे लागल्याने संपूर्ण कुटुंबानेच आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रचंड कर्ज झाल्याने मिरज, बेळंकीतील मालमत्ता विकली तरीही अद्याप दीड कोटी देणे होते. त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मृतदेहा शेजारी सापडलेल्या चिट्ठीत देखील कर्जाच्या बाबी नमूद असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. अण्णासाहेब गवाणे हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. तर त्यांचा मुलगा महेश हा इंजिनीअर होता. शेअर मार्केटमध्ये त्याने पैसे गुंतवणूक केली होती. हे पैसे गुंतवणूक करण्यासाठी त्याने काही सावकारांकडून कर्ज घेतले होते. अंदाजे कोटीच्या आसपास ही रक्कम असल्याची चर्चा आहे. महेश गवाणे याने काही दिवसांपूर्वी त्याला होणारा त्रास आणि यामुळे आपण आत्महत्या करणारी फेसबुक पोस्ट देखील लिहली होती.
मात्र त्याच्या कुटुंबाने त्याची समजूत काढत त्याचा आत्महत्याचे विचार बदलला होता. या पोस्टमध्ये आर्थिक गोष्टींचा उल्लेख करत पैशाच्या वसुलीसाठी तगादा देणाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. तसेच जे लोक त्रास देत आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती करत आई व वडील यांची आठवण करून आत्महत्या करण्याचं स्पष्ट केले होते.
दरम्यान शनिवारी बेळंकी याठिकाणी राहत्या घरी अण्णासाहेब गुरुसिद्ध गवाणे, पत्नी मालती गवाणे व मुलगा महेश गवाणे या कुटुंबाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. सकाळी अण्णासाहेब गवाणे यांचे पुतणे यांना ही घटना निदर्शनास आली. या घटनेनंतर गावात एकाच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.