प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांची हायकोर्टात धाव
सुनावणी सुरू असेपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून ईडीला रोखण्यात यावे आणि सुरू असलेल्या चौकशीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी भोसले यांनी या याचिकेतून केली आहे.
मुंबई : परदेशी विनिमय व्यवस्थापन म्हणजेच (फेमा) कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) जारी केलेल्या समन्सच्या विरोधात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. शुक्रवारी ही याचिका हायकोर्टात न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आली.
विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची 'ईडी'नं चौकशी करत आहे. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीनं अविनाश भोसले यांना समन्स बजावत त्यांच्या 'अबिल हाउस' या कार्यालयावर छापे टाकले होते. त्याविरोधात भोसले यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ही याचिका दाखल केली आहे. ईडीकडून आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची कोणतीही माहिती न देताच कार्यालयाच्या आवारात छापा टाकला त्यामुळे ईडीनं याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी भोसले यांनी या याचिकेतून केली आहे. तसेच, 'मी आणि माझा मुलगा अमित ईडीला चौकशीस सहकार्य करण्यास तयार आहोत'. त्यामुळे सुनावणी सुरू असेपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून ईडीला रोखण्यात यावे आणि सुरू असलेल्या चौकशीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणीही भोसले यांनी या याचिकेतून केली आहे.
शुक्रवारच्या सुनावणीत ईडीने पुढील सुनावणीपर्यंत कोणताही कठोर कारवाई करणार नाही, असे तोंडी आश्वासन खंडपीठाला दिलं आहे. त्याची दखत घेत याचिकाकर्त्यांच्या तातडीनं चौकशीच्या स्थगितीची मागणी अमान्य करत खंडपीठाने सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली.
2017 सली इन्कमटॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते. यावेळी ईडीने अविनाश भोसले यांना 2007 साली त्यांच्यावरती कस्टम विभागाकडून ज्या फेमा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती त्या प्रकरणासंबंधी माहिती घेण्यासाठी चौकशीला बोलावल्याचा सांगण्यात आलंय. मात्र 2007 सालच्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावून अविनाश भोसलेंच्या माध्यमातून राज्य सरकारमधील बड्या नेत्यांवर दबाव टाकण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असा प्रश्न विचारला जातोय. खासकरुन राज्य सरकारमधील एका बड्या अधिकार्यासोबत अविनाश भोसलेंच्या संबंधांची चर्चा आहे.
संबंधित बातम्या :