Aurangabad Corona : औरंगाबादमध्ये एकीकडे कोरोना वाढतोय तर दुसरीकडे अधिकाऱ्यांचा इगो अन् बेजबाबदार लोकप्रतिनिधी!
Aurangabad lockdown : औरंगाबादमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे दोघेही आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत हे आता हळूहळू सर्वसामान्य लोकांनाही कळू लागले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडा कमी होण्याऐवजी तो वाढत चालल्यामुळे औरंगाबादकरांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूचा आकडा प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी बेजबाबदारपणे वागत आहेत आणि वरिष्ठ अधिकारी एकमेकांना जुमानत नसल्यानं कोरोनावर मात कशी करायची असा प्रश्न औरंगाबादकराना पडलाय. अधिकाऱ्यांचा इगो आणि राजकरण्याचा बेजबाबदारपणामुळे औरंगाबादचं काय होईल आणि औरंगाबादला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
औरंगाबाद शहरात आजपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला होता. मात्र या निर्णयाला काही भाजप, मनसे, एमआयएम आणि व्यापाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा विरोध होता. सोबतच शहरातील नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात आणखी काही शिथिलता मिळावी आणि राज्याच्या नव्या नियमावलीवरून लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्यासाठी 31 मार्चपासून असलेला लॉकडाऊन स्थगित करण्यात आला.
मंगळवारी रात्री हा निर्णय झाल्यानंतर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील भलतेच खूश झाले. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि भर रस्त्यात कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला. हारतुरे घालून घेतले. मात्र, हे करताना कोरोनाबाबतच्या नियमांची पूर्णतः पायमल्ली झाली. याची जाणीव खासदारांना नसावी का, असा प्रश्न सर्वांना पडलाय.
त्यामुळे आता एकीकडे लॉकडाऊन करू नका असं सांगत प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या आणि रस्त्यावर नियमांची पायमल्ली करणाऱ्या खासदारावर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे. लोकांना कोरोनाबाबतचे नियम सांगायचे आणि आपण मात्र खुशाल नियम मोडायचे अशांवर कारवाई करण्यासाठी भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमत होत पोलीस ठाणे गाठले. इतकंच नाही तर अधिकारीही बेजबाबदार असल्याची टीका केली.
हे झालं आता औरंगाबाद शहरातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचं वर्तन. दुसरीकडे अधिकारी त्यापेक्षा अधिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी, महानगरपालिका, आयुक्त पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यात लॉकडाउन लावायचे की लावायचे नाही, कोणते नियम शिथिल करायचे आणि कोणते नियम कडक करायचे याबाबत एकवाक्यता नाही. इतकंच काय तर एकाने घेतलेला निर्णय दुसऱ्याच्या पसंतीला उतरत नसल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यात आज संध्याकाळपर्यंत लॉकडाऊनची पुढची दिशा काय आहे? आणि रस्त्यावर जल्लोष करणाऱ्या खासदारावर कारवाईचे काय केले हे कळलेच नाही.
अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे दोघेही आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत हे आता हळूहळू सर्वसामान्य लोकांनाही कळू लागले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडा कमी होण्याऐवजी तो वाढत चालल्यामुळे औरंगाबादकरांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आता यावर सरकार काय निर्णय घेते हे पहावं लागेल.