Ashadhi Wari 2022 : विठू माझा 'कोट्यधीश', पांडुरंगाच्या चरणी 5 कोटी 70 लाखाचे दान
Ashadhi Wari 2022 : दोन वर्षांपूर्वी झालेल्या आषाढी यात्रेच्या तुलनेत यंदा 1 कोटी 30 लाख रुपयाचे जादा दान देवाच्या खजिन्यात जमा झाले आहे.
पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी (Ashadhi Wari 2022) राज्यभरातून आलेल्या भाविकांनी देवाच्या चरणावर भरभरून दान दिल्याने देवाची तिजोरी तुडुंब भरली आहे. यात्रा काळात तब्बल 5 कोटी 70 लाख रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. . शिवाय सोने-चांदीच्या दागिन्यांची मोजदाद होणं अजूनही बाकी आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या आषाढी यात्रेच्या तुलनेत यंदा 1 कोटी 30 लाख रुपयाचे जादा दान देवाच्या खजिन्यात जमा झाले आहे. गरिबांचा लोकदेव म्हणून ओळख असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी यंदा विक्रमी गर्दी झाली होती. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त झालेल्या यंदाच्या आषाढी यात्रेला 12 लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. संपूर्ण यात्रा कालावधीत पावसाने भाविकांचे मोठे हाल केले तरी यंदा उत्साहात थोडी ही कमी आली नव्हती.
आषाढी पौर्णिमा झाल्यावर देवच्या हुंडीपेट्या, देणगी केंद्रे, लाडू विक्रीसह सर्व ठिकाणच्या रकमेची मोजदाद करणे सुरु होते. आज याची आकडेवारी जाहीर करताना यंदा गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 1 कोटी 30 लाख रुपयांनी देवाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी झाली. पंढरपुरात तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो. मात्र, काही वर्षांपासून प्रशासनाने चंद्रभागेशेजारी असणाऱ्या 65 एकर जागेवर भक्तिसागर हे निवास क्षेत्र विकसित केले होते. यंदा रेल्वेच्या ताब्यात असलेले 40 एकराचे क्षेत्र देखील प्रशासनाला मिळाल्याने यंदा 105 एकर जागेत तब्बल 5 लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली.
संबंधित बातम्या :
Ashadhi Wari 2022 : आषाढी यात्रेत 19 भाविकांचा मृत्यू, 100 हून अधिक जणांना वाचवण्यात यश
Amitabh Bachchan : सुपरस्टार अमिताभ बच्चन विठूरायाच्या चरणी नतमस्तक; ट्वीट करत शेअर केले फोटो
Ashadhi Wari 2022 : विठ्ठल हे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सांस्कृतिक एकतेचं प्रतिक, पाहा नेमका काय आहे इतिहास?