Swapnil Kusale : आता मुख्यमंत्र्यांनीही पेटारा उघडला, ऑलिम्पिक पदकवीर स्वप्नील कुसाळेला 1 कोटी रुपयांचं इनाम जाहीर!
CM Announced 1 Crore Award To Swapnil Kusale : भारतीय रेल्वेने पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला अधिकारी पदावर बढती देण्याचं घोषित केलं आहे.
Swapnil Kusale : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळेचा आता राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे.
स्वप्निलच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला शुभेच्छा तर दिल्या शिवाय वैयक्तिकरित्या फोन करून त्याचं अभिनंदनही केलं. याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याच्यावर कौतुकांचा आणि बक्षिसांचा देखील वर्षाव करण्यास सुरूवात झालीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वप्निल कुसाळेचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्रात वैयक्तिक पदक
स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत 50 मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये ब्राँझ मेडल पटकावलं. हे पदक महाराष्ट्रासाठी खास आहे. कारण 1952 साली खाशाबा जाधवांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये, कुस्तीत ऐतिहासिक ब्राँझ मेडल जिंकलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रासाठी अशी भरारी घेतलीय ती कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने अन् तीही तब्बल 72 वर्षांनी.
स्वप्नीलचा आदर्श आहे टीम इंडियाचा वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी. ज्याप्रमाणे धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता. त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभावाचा प्रभाव, त्याच्या नेमबाजीतही आज पाहायला मिळाला. ज्यामुळे त्याला यशोशिखर गाठता आलं आणि स्वप्नीलची स्वप्नवत कामगिरी जागतिक पातळीवर गौरवली गेली.
रेल्वेकडून अधिकारी पदावर बढती
तब्बल 72 वर्षानंतर एका मराठी मुलाला ऑलिंपिकमध्ये पदक मिळालेले आहे. स्वप्नील सध्या मध्य रेल्वेच्या पुणे डिव्हिजन मध्ये टीसी म्हणून काम करतोय. यामुळेच मध्य रेल्वेसाठी ही गर्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस स्वप्नील हा पॅरिस हून भारतात येईल त्यावेळेस भारतीय रेल्वेकडून त्याचा यथोचित सन्मान केला जाईल आणि ताबडतोब त्याला ऑफिसर म्हणून प्रमोशन देण्यात येणार आहे अशी घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केली. त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री स्वप्नीलसाठी रोख बक्षीस देखील जाहीर करणार आहेत, त्यामुळे आता स्वप्नील हा मध्य रेल्वेचा एक ऑफिसर म्हणून यापुढे काम करेल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी जाहीर केले आहे.
ही बातमी वाचा: