योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
मारामारीनंतर मारेकरी सतीश रेड्डीने केबलने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. टीचरने आधी बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. त्यानंतर तिने श्वासोच्छवासाचे विशेष तंत्र वापरून मृत्यूचे नाटक केले.
Bengaluru : महिला योगा टीचरला विवस्त्र करून तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला, पण योगा टीचर असल्याने हल्लेखोराला आणि मृत्यूला चकवा देण्यात यशस्वी झाली. हे प्रकरण प्रेमप्रकरणातून असल्याची माहिती कर्नाटकमधील चिकबल्लापूर पोलिसांनी दिली. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी चिकबल्लापूरपासून 30 किमी अंतरावर निर्जनस्थळी घडली होती. गाडलेल्या खड्ड्यातून बाहेर येत 34 वर्षीय योग शिक्षकाने गावकऱ्यांकडे मदत मागितली. गावकऱ्यांकडून कपडे मागितल्यानंतर ती थेट पोलिस ठाण्यात गेली. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी महिलेची वैद्यकीय तपासणी केली. याप्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे योग टीचरचे प्रकरण?
कर्नाटकातील चिकबल्लापूर येथे राहणाऱ्या बिंदू नावाच्या महिलेला तिच्या पतीचे योगा टीचरसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. महिलेने तिचा मित्र सतीश रेड्डीला योगा टिचरवर लक्ष ठेवण्यास सांगितले. रेड्डी बेंगळुरूचा रहिवासी आहे. तो एक खासगी गुप्तहेर देखील आहे. रेड्डीने 3 महिन्यांपूर्वी योगा टीचरकडून योगाचे वर्ग घेण्यास सुरुवात केली आणि या बहाण्याने त्यांनी योगा टीचरचा विश्वास जिंकला. 23 ऑक्टोबर रोजी तो योगा टीचरला घेऊन शहरात फिरायला गेला.
श्वासोच्छवासाचे विशेष तंत्र वापरून मृत्यूचे नाटक
योगा टीचरच्या म्हणण्यानुसार, शहरात फिरत असताना रेड्डीने तिला शहराबाहेर एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. यानंतर त्याने कपडे काढून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारामारीनंतर मारेकरी सतीश रेड्डीने केबलने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. टीचरने आधी बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. त्यानंतर तिने श्वासोच्छवासाचे विशेष तंत्र वापरून मृत्यूचे नाटक केले. रेड्डीने मृत समजून खड्ड्यात पुरले. यानंतर रेड्डीने आपल्या मित्रांच्या मदतीने योगा टीचरचे दागिने लुटले, माती टाकली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
गावकऱ्यांच्या मदतीने योग शिक्षक खड्ड्यातून बाहेर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी गावकऱ्यांकडून कपडे मागितले आणि नंतर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पोलिसांनी पीडित योगा टीचरची वैद्यकीय तपासणी केली
या प्रकरणी बिंदू, सतीश रेड्डीसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित योगा टीचरचीवैद्यकीय तपासणी करण्यात आली. अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या कारमधून योगा टीचरचे अपहरण करण्यात आले होते ती कार काही दिवसांपूर्वी बेंगळुरू येथून चोरीला गेला होती. आरोपी महिला बिंदू आणि सतीश रेड्डीमध्ये ऑनलाईन व्यवहारही झाले आहेत.
महिलांविरुद्धचे गुन्हे वाढत आहेत
दरम्यान, NCRB च्या अहवालात असे दिसून आले आहे की महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण (प्रति 1 लाख लोकसंख्येमागे घटनांची संख्या) 2021 मध्ये 64.5 टक्क्यांवरून 2022 मध्ये 66 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. 2022 मध्ये 19 महानगरांमध्ये एकूण 48 हजार 755 महिलांवरील गुन्ह्यांची नोंद झाली, जी 2021 च्या तुलनेत 12.3 टक्के अधिक आहे (43 हजार 414 प्रकरणे). एनसीआरबीच्या अहवालानुसार 2022 च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, महिलांविरोधातील 65 हजार 743 गुन्ह्यांसह उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र (45331 प्रकरणे) आणि राजस्थान (45058 प्रकरणे) आहेत. महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या बाबतीत पश्चिम बंगाल चौथ्या क्रमांकावर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या