Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Shrirampur Assembly Constituency : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना राधाकृष्ण विखे पाटलांनी भर सभेत इशारा दिला आहे.
अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचा धुराळा उडाला आहे. त्यातच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील दोन पक्षांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पेच निर्माण झालाय.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात (Shrirampur Assembly Constituency) राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे (Lahu Kanade) तर शिंदे शिवसेनेकडून भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण? अशा चर्चांना उधाण आले आहे.
शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा
ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे लहू कानडे यांच्या श्रीरामपूर शहरातील प्रचारार्थ झालेल्या सभेत महायुतीचे अधिकृत उमेदवार लहू कानडे असल्याचं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) व राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. भाऊसाहेब कांबळे आता बस्स झालं! प्रचारात माझा फोटो वापरू नका, तुम्ही विश्वासघात केलाय, असा इशाराच शिंदे गटाच्या उमेदवाराला देत विखे पाटील यांनी लहू कानडे आमचे अधिकृत उमेदवार असल्याची वक्तव्य केलंय. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राधाकृष्ण विखेंना राजेंद्र पिपाडांचं आव्हान
दरम्यान, शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राजेंद्र पिपाडा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करत होते. शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील बंडखोरी रोखण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रयत्न केले. मात्र राजेंद्र पिपाडा हे अपक्ष निवडणूक लढण्यावर शेवटपर्यंत ठाम राहिले. त्यामुळे आता शिर्डीत मविआकडून प्रभावती घोगरे, महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील तर अपक्ष राजेंद्र पिपाडा यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा