ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
Raj Thackeray vs Sanjay Raut : राज ठाकरेंनी 'भिकार संपादक' उल्लेख केल्यानंतर संजय राऊतांनी संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा मनसेने संजय राऊतांना डिवचलं आहे.
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख 'भिकार संपादक' असा केला होता. तसेच त्यांना वाटतं की तोंड त्यांनाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत. आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज ठाकरेंना जशाच तसे उत्तर दिले. ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राऊत आहे, असे त्यांनी म्हटले. आता संजय राऊत यांच्या टीकेवर मनसेने पुन्हा पलटवार केलाय.
मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी म्हटलं की, बाळासाहेबांनी फक्त भाषा कोणती वापरायची हे शिकविलेले लक्षात आहे. पण काँग्रेससोबत जाऊ नका हे लक्षात नाही का संजय राऊत यांना? राज ठाकरे यांनी धनुष्यबाणावर बोलल्यानंतर यांना आनंद झाला होता. पण, आता यांच्यावर टीका केली तर लगेच बोलायला लागले, असा पलटवार त्यांनी संजय राऊत यांच्यावर केलाय. तसेच संजय राऊत यांनी अंडर वर्ल्डबद्दल बोलू नये, त्यांच्या भावाचे, सुनील राऊत यांचे कोणासोबत संबंध आहेत, कोणासाठी संजय राऊत आणि सुनील राऊत कॉल करायचे? सुनील राऊत यांच्या ऑफिसमध्ये कोण कोण भेटायला यायचे, हे सगळे आम्हाला माहीत आहे, आम्हाला बोलायला लावू नका, असा इशाराही अविनाश जाधव यांनी संजय राऊतांना दिलाय.
राज ठाकरेंची संजय राऊतांवर टीका
दरम्यान, राज ठाकरे यांनी विक्रोळीतील जाहीर सभेतून संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली होती. संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करून टाकणारा एक भिकार संपादक इकडे राहतो. त्यांना वाटतं की तोंड त्यांनाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत. आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. घाण करुन टाकलं सगळं राजकारण! संयम बाळगतोय याचा अर्थ गांxx समजू नये, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी संजय राऊत यांच्यावर केला होता.
संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. भाजपाच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो? जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, लूट करतायत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. ज्याला जी भाषा समजते, त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलंय. राज ठाकरे काय बोलले, त्यात मला जायचं नाही. निवडणुका आहेत, भारतीय जनता पक्षाचं स्क्रिप्ट आहे. फडणवीसांच स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं, नाहीतर ईडीची तलवार आहेच, त्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची, काय बोलायचे आणि काय लिहायचे, याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राऊत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
आणखी वाचा