(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता यांत्रिक कर्मचारी, वाहतूक निरीक्षक होणार एसटीचे 'चालक' आणि 'वाहक'! महामंडळाचे आदेश
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी व सहाय्यक वाहतूक निरीक्षकांना एसटी बसेसवर 'चालक' म्हणून तर वाहतूक नियंत्रकांचा 'वाहक' म्हणून वापर करून बसफेऱ्या वाढवण्याचे ठरवले आहे.
ST Protest Updates : एसटी बस सेवा सुरळीत सुरू राहावी म्हणून यांत्रिक कर्मचारी, वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रकाचा वापर 'चालक' आणि 'वाहक' म्हणून होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू केलेला संप मिटण्याची चिन्हे दिसत नाहीये. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी व सहाय्यक वाहतूक निरीक्षकांना एसटी बसेसवर 'चालक' म्हणून तर वाहतूक नियंत्रकांचा 'वाहक' म्हणून वापर करून बसफेऱ्या वाढवण्याचे ठरवले आहे.
गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्यामध्ये चालक आणि वाहक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्याचा फटका एसटी बसच्या वाहतुकीला बसत आहे. यावर पर्याय म्हणून हा निर्णय एसटी महामंडळ घेत आहे
त्यासाठी या कर्मचाऱ्याना त्या त्या आगारात प्रशिक्षणही दिले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार संप कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहक परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती दिली गेली त्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचा प्रवासी वाहनांवर चालक म्हणून वापर केला जाईल.
दुसर्या टप्प्यात ज्या यांत्रिकी कर्मचार्यांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना आहे, अशा कर्मचार्यांची विभागीय पातळीवर माहिती गोळा करून त्यांच्याकडून विभागीय पातळीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तत्काळ आनलाईन अर्ज करून प्रवासी वाहन चालक अनुज्ञप्ती बिल्ला काढावयाचा आहे.
यांत्रिक अथवा वाहतूक कर्मचाऱ्यांचा वापर संप काळात चालक म्हणून आणि वाहतूक नियंत्रक यांचा वापर संप काळात वाहक म्हणून केल्यास अशा कर्मचाऱ्यांना प्रती दिन ३०० रुपये इतका प्रोत्साहन भत्ता देण्याचीही तरतूद करण्याची सूचना महामंडळाने सर्व विभाग नियंत्रकांना करण्याचेही आदेशात नमूद आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या: