Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शाब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
Beed News: धनंजय मुंडे हे अडचणीत सापडले आहेत. बीड डीपीडीसीच्या बैठकीत सुरेश धस त्यांच्यासमोर होते. धनंजय मुंडे यांना भगवानगडाचा पाठिंबा. नामदेवशास्त्री मैदानात

बीड: पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. ही बैठक अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली होती. संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात होती. कारण या बैठकीत धनंजय मुंडे आणि सुरेश धस आमनेसामने आले होते. यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आता समोर आली आहे. मी बोलल्यापासून 500 लोक कोमात गेले आहेत. आमचे भांडण हे गुद्द्याचे नव्हे तर मुद्द्याचे झाले आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले. अडीच तास चाललेल्या या बैठकीत शेवटच्या काही मिनिटांत हा सगळा गोंधळ घडला. पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सर्व ऐकत होते. हे वाढणार नाही, याची काळजी म्हणून पवार यांनी बैठक संपली असे सांगून सभागृहातून बाहेर पडल्याचे सांगितले जाते.
तत्पूर्वी अजित पवार आणि सुरेश धस यांच्यातही पुसटशी वादाची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली होती. सुरेश धस हे बैठकीत सातत्याने बीड जिल्ह्यात बोगस विकासकामे दाखवून 70 कोटी रुपये उचलल्याचा आरोप करत होते. त्यावेळी अजित पवार यांनी सुरेश धस यांना तुम्ही लई मागचं बोलू नका, असे सांगत गप्प बसवले. तुमचे जे म्हणणे असेल, ते लेखी स्वरुपात द्या, असे अजित पवार यांनी सुरेश धस यांना सांगितले होते. त्यानंतर आता या बैठकीत सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातही बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील वातावरण प्रचंड तापले होते, असे सांगितले जाते.
बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस यांच्यात शाब्दिक चकमक कशी झाली?
धनंजय मुंडे : जिल्हा बदनाम होईल असे कोणी बोलू नका, याचा परिणाम शासकीय कार्यालये आणि कामकाजावरही होत आहे.
सुरेश धस : तुम्ही माझ्यावर बोट दाखवताय का?
धनंजय मुंडे : मी कॉमन बोलत आहे
सुरेश धस : नाव घेऊन बोला
खासदार बजरंग सोनवणे : नाव घ्या
सुरेश धस : आमचे माणसं मारले
धनंजय मुंडे : तुम्ही कुठे बसलात, काय बोलताय समजतंय का?
अजित पवारांनी बैठकीत अधिकाऱ्यांना काय सांगितले?
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवार यांनी बीडमधील सरकारी अधिकाऱ्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला.अधिकाऱ्यांनी कुणाच्याही दबावात काम करण्याची गरज नाही. पोलिसांच्या कामातही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. बीड जिल्ह्यातील कामे दर्जेदार झाले पाहिजेत. जर तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्ही थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क करा, असे अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले.
आणखी वाचा
बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
