मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Dhananjay Munde : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडावर दाखल झाले. नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे दिसून आले.

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे भगवानगडावर आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मागील दीड महिन्यापासून धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेले आरोप आणि त्यांच्या राजीनाम्याची होणारी मागणी यामुळे धनंजय मुंडे यांच्या भगवान गड भेटीला विशेष महत्त्व आहे. काल गुरुवारी (दि. 31) भगवान गडावर आल्यानंतर त्यांनी संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन, महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली आहे. यानंतर आज नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे दिसून आले.
नामदेव शास्त्री महाराज पत्रकार परिषदेत म्हणाले की, धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणूनबुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदायाचे नुकसान आहे.
धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत
भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कम पाठीशी आहे. याचे दोन भाग आहेत जे गुन्हेगार असतील त्याचा शोध सुरु आहे. मला मीडियाला एक विचारायचे आहे की, ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली? याची दखल मिडीयाने का घेतली नाही. अगोदर त्यांना जी मारहाण झाली ते देखील दखल घेण्याजोगे आहे, असे मला वाटते. तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला. धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत. गेल्या 53 दिवसापासून मिडीया ट्रायल सुरू आहे. धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही. धनंजय मुंडेंची पार्श्वभूमी तशी नाही. त्यांना गुन्हेगार का ठरवले जात आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राजकीय स्वार्थ क्षणिक
ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाने संप्रदायावर भयानक परिणाम झालेला आहे. जातीयवाद ज्या लोकांना माहिती नाही, त्यांना सुद्धा जातीयवाद माहीत झाला आहे. जे संत सामाजिक सलोखा तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे. राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो. काही काळापुरता राजकीय फायदा असतो, तो कायमस्वरूपी नाही. पण कायमस्वरूपी सलोखा बिघडून सामाजिक पाप करणाऱ्या माणसाला कधी समाधान मिळत नाही, असेही नामदेव शास्त्री महाराज यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
