विद्यापीठ शेतकऱ्यांना देणार दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण, कोल्हापूरला प्रशिक्षण केंद्र उभारणार
शेतकऱ्यांना दूध उत्पादनातून अधिकचा नफा मिळावा यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कोल्हापूर : राज्यातील बहुसंख्य शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. पशुपालन व्यवसाय हा बहुतांशी दूध उत्पादनावर अवलंबून असतो. हे दूध खासगी तसेच सहकारी दूध प्रकल्पांना घालून शेतकरी आर्थिक व्यवहार करत असतात. महाराष्ट्र हे दूध उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर असलेले राज्य आहे. मात्र, सातत्याने दूध दराच्या मुद्यावरुन शेतकरी सरकार आणि दूध संघ यांच्यात कलगीतुरा रंगलेला दिसतो. मात्र, आता शेतकऱ्यांना दूध उत्पादनातून अधिकचा नफा मिळावा यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना विद्यापीठातर्फे आता दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. शेतकऱ्यांनी केवळ दूध पुरवठाच न करता, दुधावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती व विक्री केल्यास त्यांची चांगली आर्थिक प्रगती होऊ शकते.
कोल्हापूरला प्रशिक्षण केंद्र
दूध उत्पादकांना वर्षानुवर्षे दुग्धजन्य पदार्थ निर्मितीबाबत काहीही सांगण्यात आले नाही. त्यामुळे दूध उत्पादकांना अधिकचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे विद्यापीठाचे प्रशिक्षण केंद्र भविष्यात मोलाची भूमिका बजावेल अशी माहिती विद्यापीठाच्या सुत्रांनी दिली आहे. दूध प्रक्रियेतून शेतकऱ्यांना 30 ते 50 टक्क्यांपर्यंत अधिकचा नफा मिळू शकतो. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना अत्यावश्यक ठरणारे तांत्रिक प्रशिक्षण देण्याच्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील दूध उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूर हे जिल्हे आघाडीवर आहेत. हे तीनही जिल्हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या आखत्यारीत येतात. म्हणून या जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. हे प्रशिक्षण केंद्र कोल्हापूरला उभारले जाणार असून, यासाठी साधारणत 50 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
मार्चपासून प्रशिक्षण केंद्र सुरू
सध्या कोल्हापूरमध्ये प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम सुरू आहे, मार्च महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून मिळाली आहे. दुधावर स्वतंत्र प्रकिया करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मोठा वाव आहे. या माध्यमातून वेगवेगळे पदार्थ तयार करुन शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. दूध उत्पादक शेतकरी अधिक जागृत होतील. सध्या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूरचा समावेश आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण हे विनामूल्य असणार आहे. हे प्रशिक्षण तीन ते पाच दिवसांचे असणार आहे.
शेतकऱ्यांच्या पोरांसाठी व्यवसायाची दारं उघडतील - डॉ. अजित नवले
दुग्धजन्य पदार्थ प्रशिक्षण केंद्राच्या मुद्याबाबत एबीपी माझाने किसान सभेचे नेते आणि वेळोवेळी दूध मुद्दयांवर आंदोलन करणारे डॉ. अजित नवले यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. दूध उत्पादक शेतकरी कुटुंबांना आर्थिक सक्षमता मिळावी, यासाठी हा निर्णय चांगला आहे. दुधाच्या विक्रीपेक्षा दुग्धजन्य पदार्थांच्या प्रक्रिया आणि विक्रीमध्ये चांगला नफा मिळू शकतो असे नवले यावेळी म्हणाले. यासोबतच शेतकऱ्यांना जर अल्प व्याजदरात भांडवल उभे करण्यासाठी किंवा साधनसामुग्रीसाठी शासनाने सहकार्य केले तर याचा सकारात्मक परिणाम दूध उत्पादक शेतकरी कुटुंबावर होईल. प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांच्या हातात नसल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळत नसल्याचे ते म्हणाले.
दूध व्यवसायात मोठमोठ्या मल्टी नॅशनल कंपन्या उतरल्या आहेत. त्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांकडे असणारे भांडवल, तंत्रज्ञान आणि विक्रीची प्रक्रिया ही कमी राहणार आहे. त्यांच्यासमोर दूध उत्पादक शेतकऱ्यांना तग धरणे अवघड जाणार आहे. कारण, शेतकऱ्यांना दुग्धनजन्य पदार्थ निर्मिती प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी जागा, भांडवल, पॅकिंग आणि विक्रीची असणारी व्यवस्था त्याचबरोबर मार्केटींची प्रक्रिया एवढ्या मोठ्या प्रमाणात नसणार आहे. मनुष्यबळाचा देखील प्रश्न आहे. पण यानिमित्ताने छोट्या कुटुंबांना एक चांगला आधार मिळू शकतो. छोट्या मशनरीच्या माध्यमातून शेतकरी दुग्धजन्य पदार्थ तयार करु शकतात असे नवले म्हणाले. यामाध्यमातून शेतकऱ्यांच्या पोरांना व्यवसायाची दारे उघडी होतील. त्यांना तंत्रज्ञानाची माहिती होईल. त्यांना कळेल की प्रक्रिया उद्योगातून किती नफा मिळतो ते, म्हणजे भविष्यकाळात ते कच्च्या मालाच्या दरासाठी लढा देतील असे नवले म्हणाले.
याचबरोबर दूध उत्पादक शेतकरी सक्षम करण्यासाठी दुधाला एफआरपीचे (FRP) धोरण लागू करावे आणि रेव्हिनीव्ह शेअरींगचे धोरण लागू करावे. म्हणजे दूध प्रक्रिया उद्योगांना जो अधिकचा नफा होतो, त्या नफ्यातून शेतकऱ्यांना रेव्हिनीव्ह शेअरींगचे धोरण लागू करावे असे नवले म्हणाले. दुधाच्या बाबतीत 20:80 चे धोरण लागू करावे. म्हणजे 20 टक्के नफा दूध प्रक्रिया उद्योगाला आणि 80 टक्के नफा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा असे नवले यावेळी म्हणाले.
दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला निर्णय आहे असे म्हणावे लागेल, कारण त्यांना या माध्यमातून व्यवसायाची दारे उघडी होणार आहेत. तसेच त्यांना नवीन तंत्रज्ञान देखील अवगत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: