(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अॅमेझॉनच्या अॅपमध्ये आता मराठीचा समावेश, मनसेच्या इशाऱ्याची दखल
अॅमेझॉनच्या वेबसाईट आणि अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश व्हावा यासाठी मनसेने मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत अॅमेझॉनने लवकरच मराठी भाषेचा समावेश करणार असल्याची ग्वाही दिली.
मुंबई: अॅमेझॉनच्या ऑनलाईन डिजिटल शॉपिंग अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा या मनसेच्या मागणीचा अॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस यांनी दखल घेतली असून यासंदर्भात मनसेला एक अधिकृत ई-मेल पाठवला आहे. अॅमेझॉनचे एक शिष्टमंडळ आज मुंबईत दाखल झालं असून ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
15 ऑक्टोबरला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या मुंबईतील संबंधित कार्यालयांना भेट देऊन मराठी भाषेच्या वापराबाबत मागणी केली होती आणि तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाईटवर हिंदी आणि इंग्रजीसह गुजराती, तेलगू, तमिळ या भाषांचा समावेश आहे. पण मराठीचा समावेश नाही. या प्रश्नावर मनसे आक्रमक झाली होती आणि मनसे नेते अखिल चित्रे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांच्या त्या त्या कार्यालयांना भेटी देऊन त्यांच्या वेबसाईटमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. असे न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
मनसेच्या या मागणीची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यानी दखल घेतली आहे. कंपनीने मराठीच्या या मागणीवर सकारात्मक विचार करत असल्याचा एक ई-मेल मनसेला पाठवला आहे. मराठी भाषेचा त्यांचा वेबसाईटवर समावेश करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येईल यावर विचार करण्यासाठी अॅमेझॉनची एक लीगल टीम आज मुंबईत पोहोचली आहे.
ॲमेझाॅनच्या डिजिटल सेवेत (Trading App) मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची ॲमेझाॅनचे संस्थापक जेफ बेझॉस ह्यांच्या प्रतिनिधींनी घेतली दखल. अमेझॉनचं शिष्टमंडळ आज मुंबईत... राजसाहेब म्हणतात तसं... तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं. @mnsadhikrut pic.twitter.com/tpPGCCJyDt
— Akhil Chitre (@akhil1485) October 20, 2020
अॅमेझॉनच्या कस्टमर केअर मध्येही हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू आणि गुजराती या भाषा वापरण्यात येतात. त्यात आता मराठी भाषेचाही समावेश करण्यात येणार असल्याचं अॅमेझॉनने स्पष्ट केलं आहे.
दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या कंपन्यांनी खरेदीवर मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर ऑफर दिल्या आहेत.