राज्यातील शेतकऱ्यांपुढे 'बोगस बियाणां'चं नवं संकट; आतापर्यंत 1 हजार 85 तक्रारी दाखल
Bogus Seed : एकूण तक्रारीपैकी 927 पंचनामे झाले आहेत. यात बहुतांश तक्रारी कापूस आणि सोयाबीन बियाणांच्या आहेत.
Bogus Seed : गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले. मात्र, त्यातून सावरत शेतकऱ्याने यंदा पुन्हा मोठ्या अपेक्षेने महागड्या बियाणांची खरेदी करून पेरणी केली. पण, अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच राज्यभरातून बोगस बियाणांच्या तक्रारी येत असल्याने खळबळ उडाली आहे. मराठवाड्यासह राज्यभरात बोगस बियाणांच्या आतापर्यंत 1 हजार 85 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर आलेल्या एकूण तक्रारींपैकी 927 पंचनामे झाले आहेत. यात बहुतांश तक्रारी कापूस आणि सोयाबीन बियाणांच्या आहेत.
शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्याच्या घटना दरवर्षी समोर येत असतात. मात्र, थातूरमातूर कारवाई केल्या जात असल्याने हे प्रकार वाढत चालले आहे. आधीच संकटात असलेला शेतकरी कर्ज काढून महागड्या बियाणांची खरेदी करतो. पेरणी केल्यावर चांगले पीक येईल आणि उत्पन्न होईल, अशी अपेक्षा त्यांना असते. मात्र, अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक केली जाते. राज्यात अशा बोगस बियाणांच्या 1 हजार 85 तक्रारी दाखल झाल्या आहेत. ज्यात सर्वाधिक 200 तक्रारी लातूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.
जिल्हा | दाखल गुन्हे | तक्रारी | पंचनामे |
अकोला | 00 | 60 | 54 |
अमरावती | 04 | 118 | 118 |
बुलढाणा | 01 | 43 | 43 |
यवतमाळ | 02 | 01 | 01 |
नागपूर | 00 | 01 | 01 |
भंडारा | 00 | 02 | 01 |
चंद्रपूर | 12 | 46 | 46 |
गडचिरोली | 01 | 03 | 03 |
वर्धा | 03 | 00 | 00 |
गोंदिया | 02 | 00 | 00 |
औरंगाबाद | 00 | 199 | 196 |
जालना | 01 | 78 | 75 |
बीड | 00 | 115 | 86 |
लातूर | 00 | 200 | 193 |
उस्मानाबाद | 00 | 37 | 35 |
नांदेड | 03 | 43 | 00 |
परभणी | 03 | 10 | 10 |
हिंगोली | 00 | 88 | 88 |
जळगाव | 10 | 00 | 00 |
धुळे | 03 | 00 | 00 |
नाशिक | 01 | 03 | 03 |
अहमदनगर | 00 | 199 | 135 |
नंदूरबार | 02 | 00 | 00 |
सातारा | 02 | 00 | 00 |
सोलापूर | 00 | 03 | 00 |
आतापर्यंत अशी झाली कारवाई?
राज्यात बोगस बियाणाच्या ताकारी येत असतानाच कृषी विभागाने पंचनामे सुरु केले आहे. तर बोगस बियाणेविरोधात कारवाईला देखील सुरुवात केली आहे. राज्यात आतापर्यंत प्रतिबंधित एचबीटी कपाशीचे 3 हजार 799 पाकिटे जप्त करण्यात आले आहेत. तर 885 कांदा बियाणे पाकीट, सोयाबीनचे 5 हजार 264 पाकीट जप्त करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत एकूण 1 हजार 88 पंचनामे करण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :