Suresh Dhas on Walmik Karad : अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
भाजप आमदार सुरेश धस तसेच आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री ठेवण्याची मागणी केली.
Suresh Dhas on Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वाधिक आरोप झालेला आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये 'गुंडा राज' खपवून घेतला जाणार नाही, असे म्हटले आहे. दुसरीकडे, भाजप आमदार सुरेश धस तसेच आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री ठेवण्याची मागणी केली. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय असून बीडमध्ये प्रति पालकमंत्री समजला जातो.
तर वाल्मिक कराड 302 मध्ये येऊ शकतो
सुरेश धस यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर कराडच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, या प्रकरणात सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी असून त्याचा आणि प्रतीक घुले या दोघांचा सहभाग जास्त आहे. वाल्मीक कराड शरण आला आहे. तो 100 टक्के 120 ब मध्ये आहे, पण माझा अंदाज आहे की जर त्यांनी व्हिडिओ पाहिला असेल तर तो पण 302 मध्ये येऊ शकतो असे धस म्हणाले.
खालचा अधिकारी उचलायचा आणि खंडणी मागायची
धस म्हणाले की, ऑक्टोबर 2023 मध्ये पाटोदा तालुक्यामध्ये अशीच एक घटना घडली होती, त्यावेळी एका कंपनीच्या बंडगर नावाच्या अधिकाऱ्याला असेच उचलण्यात आले होते. तेव्हा मी सांगितले होते परळी पॅटर्न आणू नका, खालचा अधिकारी उचलायचा आणि खंडणी मागायची असे प्रकार सुरू होते. असे प्रकार वाढल्याने दोन कोटींची खंडणी मागायची यांची हिम्मत झाली. 50 लाख घेतले, उरलेली दीड कोटी मागायला माणसं पाठवली होती. अकानेच (वाल्मिक कराड) ही माणसे पाठवली होती. या प्रकरणी मोका लावण्याची घोषणा आधीच मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे ते म्हणाले. कराड हा मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हा फरार झाला होता. कराडला अटक करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला.
संतोष देशमुख यांची हत्या का झाली?
मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाबाबत सरपंच संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले नावाच्या व्यक्तीशी वाद झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवनचक्की प्रकरणी सुदर्शन घुले हा वारंवार खंडनची मागणी करत होता. याबाबत सरपंच संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर रागातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सरपंच खून प्रकरणातील दोषी कोण?
या खून प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार आहेत. चाटे आणि केदार या दोन आरोपींना तांबवा गावातून, तर प्रतिक घुले याला स्थानिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले. बीडमध्ये महामार्गावर विष्णू चाटे याचा पाठलाग करून हातकड्या लावण्यात आल्या मात्र तीन आरोपी अद्याप फरार आहेत. सरपंच संतोष यांच्या हत्येमागे वाल्मीक कराड हे सूत्रधार असल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जातो. विशेष म्हणजे कराडवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या