Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?
Walmik Karad: बीडच्या वैद्यनाथ महाविद्यालयात शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणारा तरुण, धनंजय मुंडेचा राईट हँड, बीडमध्ये वाल्मिक कराडचा दबदबा कसा वाढला?
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा ठपका असलेल्या वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड जवळपास 22 दिवस फरार होते. या 22 दिवसांत पोलीस यंत्रणेला त्यांचा माग काढता आला नव्हता. यापैकी काही दिवस तर वाल्मिक कराड हे पुण्यात होते. तरीही पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला वाल्मिक कराड यांचा ठावठिकाणा कळू शकला नव्हता. अखेर स्वत: वेळ आणि स्थळ ठरवून वाल्मिक कराड यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्कारली. मात्र, यानिमित्ताने बीडच्या राजकारणात 'अण्णा' म्हणून ख्याती असलेल्या वाल्मिक कराड यांचा प्रशासन आणि राजकारणात किती दबदबा आहे, याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत.
बीडच्या राजकारणात वाल्मिक कराड यांची ओळख धनंजय मुंडे यांचा उजवा हात अशी निर्माण झाली होती. धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून इतर गोष्टींचे नियोजन ते धनंजय मुंडे हे बीडमध्ये नसताना सर्व गोष्टी हाताळणाऱ्या वाल्मिक कराड यांना बीडचा प्रति पालकमंत्रीही म्हटले जायचे. त्यामुळे साहजिकच स्थानिक पोलीस आणि प्रशासनावर वाल्मिक कराड यांचा वचक होता. वाल्मिक कराड यांच्यावर खंडणी, हाणामारी, निवडणुकीतील गैरप्रकार अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असतानाही त्यांचा शस्त्र परवाना कायम होता. इतकेच काय संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर फरार झाल्यानंतरही वाल्मिक कराड यांना दोन पोलिसांचे संरक्षण होते, अशी चर्चा होती. यावरुन वाल्मिक कराड यांनी बीडच्या राजकारणात किती मोठी उंची गाठली आहे, याचा प्रत्यय येऊ शकतो.
कॉलेजमध्ये गोपीनाथ मुंडेंचा निस्सीम भक्त असणारा वाल्मिक कराड धनुभाऊंचा राईट हँड कसा बनला?
वाल्मिक कराड यांनी बीडच्या स्थानिक राजकारणापासून ते प्रति पालकमंत्री असा प्रवास केला आहे. वाल्मिक कराड यांच्या आवाजातील जरब, रांगड्या स्टाईलमध्ये कामं करण्याची पद्धत यामुळे त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते. नव्वदीच्या दशकात वैद्यनाथ महाविद्यालयात शिक्षण घेत असताना वाल्मिक कराड हे शर्टच्या मागच्या बाजूला गोपीनाथ मुंडे यांचे फेटाधारी छायाचित्र लावून फिरायचे, अशी आठवण आजही अनेकजण सांगतात. महाविद्यालयीन निवडणुका, त्यानंतर गोळीबारात जखमी होणे, अशा घटनांमुळे वाल्मिक कराड सु्रुवातीपासूनच बीडच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले. परळीत नगरपालिकेत त्यांनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, गटनेता अशी अनेक महत्त्वाची पदे भुषविली आहेत. प्रत्येक टप्प्यावर हातातील यंत्रणेचा पुरेपूर वापर करत वाल्मिक कराड यांनी स्वत:भोवती गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्यांचे एक जाळे तयार केले. त्यामुळे वाल्मिक कराड यांची बीडच्या राजकारणात आपल्या पद्धतीने हवे ते करुन घेणारा नेता म्हणून अशी ओळख निर्माण झाली. यामुळे स्थानिक राजकारणातील त्यांचा दबदबा प्रचंड वाढला. 'अण्णा' या नावाला बीडमधील पोलीस आणि सरकारी अधिकारीही वचकून आहेत.
वाल्मिक अण्णांनी राखेतून आर्थिक भरारी कशी घेतली?
वाल्मिक कराड यांनी बीड जिल्ह्यात स्वत:ची अशी समांतर यंत्रणा निर्माण केली होती. सुरेश धस यांच्यासारख्या नेत्यांनी वाल्मिक कराड यांनी बीड जिल्ह्यात हजारो एकर जमिनी विकत घेतल्याचा दावा केला होता. इतक्या मोठ्याप्रमाणावर जमिनी विकत घेण्याची आर्थिक ताकद वाल्मिक कराड यांच्याकडे कशी आली, हा प्रश्न अनेकांना पडला. या प्रश्नाचे उत्तर म्हणजे राखेतून मिळालेली ऊर्जा. वाल्मिक कराड यांच्यावर सध्या पवनचक्की निर्माण करणाऱ्या कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या राखेच्या अवैध वाहतुकीतून कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केल्याचे आरोप होतात. या राखेतून मिळालेल्या उर्जेमुळे वाल्मिक कराड यांची राजकीय ताकद वाढली होती, असे सांगितले जाते.
आणखी वाचा
न्यायालयात वाल्मिक कराडच्या वकीलांनी कोणता युक्तिवाद केला?; म्हणाले, आम्हाला राजकीय...