Gautam Gambhir on India Performance : 'बस्स आता खूप...'; टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापला
Ind vs Aus Gautam Gambhir: भारत आणि ऑस्ट्रिलिया (India vs Australia) यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) चांगलाच संतापल्याचे समोर आले.
चौथ्या कसोटीतील पराभवानंतर आता पुरे झाले..., असं म्हणत गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंना फटकारले. तसेच गंभीरने वरिष्ठ खेळाडूंवरही नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरणही चांगले नसल्याचंही समोर आलं आहे. ठरलेल्या योजनांचे अनुसरण करण्याऐवजी खेळाडू स्वत:च्या इच्छेनुसार वागत असल्याचे गौतम गंभीरने ड्रेसिंग रुममधील बैठकीत सांगितले. तसेच आतापासून रणनीती न पाळल्यास त्यांना 'धन्यवाद असे म्हटले जाईल, असा इशाराही गंभीरने भारतीय खेळाडूंना दिला आहे.
गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताची कामगिरी घसरली-
गंभीरच्या कोचिंगमध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली झालेली नाही. बांगलादेशविरुद्धचे दोन कसोटी सामने जिंकल्यानंतर भारताला न्यूझीलंडकडून 3-0 असा पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेविरुद्ध 27 वर्षात पहिल्यांदाच द्विपक्षीय एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावली. 10 वर्षांनी भारताने एकाच बॉर्डर- गावसकर चषक कसोटी मालिकेत दोन सामने गमावले. मेलबोर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) भारताने 13 वर्षांनी कसोटी पराभव पत्करला. 8 वर्षांनी भारताने एमसीजी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना गमावला. एकूणच, गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताची कामगिरी घसरली आहे.