Raj Thackeray On New Year: मराठी माणसावर, हिंदूंवर अन्याय झाल्यावर अंगावर येऊ, राज ठाकरेंची पोस्ट
Raj Thackeray On New Year मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नवीन वर्षानिमित्त एक्स (आधीचे ट्विटर)वर पोस्ट केली आहे. 25 वर्षात अनेक बदल, तरी काही गोष्टी आहेत तशाच राहिल्या. मराठी माणूस अजूनही महाराष्ट्राच्या राजधानीत असुरक्षितच असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच मराठीवर हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईन आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावल्यासही अंगावर येईन, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा...कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे , कारण या शतकातील, पाव शतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की 25 वर्षांपूर्वीच आयुष्य हे वेगळं युग वाटावं. या 25 वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं. या 25 वर्षांत जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात, मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं. तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यान नोकरीच्या संधी मिळणं. बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणं लावणं. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांच आयुष्य महागाईने होरपळून निघणं. आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे. पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं, असं राज ठाकरेंनी सांगितलं.