वेठबिगारी विरोधात श्रमजीवी संघटना पुन्हा आक्रमक, भिवंडीतील मजुरांची मुक्तता
मजुरांच्या असाहाय्यतेच फायदा उचलून त्यांना अत्यल्प मजुरीत राबवणे बंद व्हावे आणि कायद्याने गुन्हा असलेली बयाना पद्धत बंद करावी, यासाठी विवेक पंडित यांनी मालकांना बयाना देऊ नका असं आवाहन केलं होतं.
ठाणे : आदिवासी मजुरांना बयाना (अगावू रक्कम) देऊन गुलामगिरीत अडकवण्याच्या अन्यायकारक प्रथेला श्रमजीवी संघटनेने विरोध केला आहे. मागील महिनाभरात दाखल झालेल्या तीन गुन्ह्यानंतर गुरुवारी कल्याण तालुक्यातील एक वीटभट्टी मालकावर बंधबिगार पद्धती अधिनियम 1976 अन्वये गुन्हा दाखल करुन एका आदिवासी मजूर कुटुंबाला श्रमजीवी संघटनेने मुक्त केले. आतापर्यंत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण चार विटभट्टी मालकांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
नरेश जाधव या मजुराची पत्नी अंजनी हिच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. गेले आठ दिवस ठाणे, पालघर जिल्ह्यातील श्रमजीवी संघटनेचे सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या गटाने वीटभट्टीवर प्रत्यक्ष जाऊन मजुरांशी संवाद साधत आहेत. यामध्ये ज्याठिकाणी मजुरांना बळजबरीने आणले असेल, मारहाण होत असेल अशा प्रकणात तातडीने कारवाई केली जात आहे. सोबतच विवेक पंडित यांनी जव्हार मोखाड्यातून होणाऱ्या मजुरांच्या स्थलांतरामुळे कुपोषणासारखे अनेक प्रश्न उभे राहत असल्याने हे स्थलांतर रोखून आदिवासींना गावातच रोजगार कसे मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
कल्याण तालुक्यातील निंबवली गावातील दिनेश केणे आणि संजय कचरू केणे यांच्या वीटभट्टी वर आसलेल्या नरेश जाधव या भिवंडी तालुक्यातील चिंचवली गावातील मजुर कुटुंब 20 हजार रुपये बयाना घेतल्याने काम करत होते. नरेशच्या ओळखीच्या वाडा तालुक्यातील मजुरांनी याच मालकाकडून 10 हजार रुपये उचल घेतली होती. मात्र त्यांनी कामावर येण्यास नकार दिला होता. त्यामुळे मालकाने याबाबत नरेशला जबाबबदार धरत त्याने कर्ज काढून विकत घेतलेली मोटारसायकल स्वतः ताब्यात घेतली होती आणि अत्यल्प मजुरीत राबवले जात होते. विवेक पंडित हे गुरुवारी आश्रमशाळा आणि वीटभट्टी मजुरांशी सवांद दौरा होता यात हा प्रकार समोर आला. तातडीने याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात मालक दिनेश आणि संजय कचरू केणे यांच्यावर वेठबिगारी आणि अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून मजुरांची मुक्तता करण्यात आली.
मजुरांच्या असाहाय्यतेच फायदा उचलून त्यांना अत्यल्प मजुरीत राबवणे बंद व्हावे आणि कायद्याने गुन्हा असलेली बयाना पद्धत बंद करावी, यासाठी विवेक पंडित यांनी मालकांना बयाना देऊ नका असं आवाहन केलं होतं. मात्र तरीही काही मालकांनी बळजबरीने मजुरांना उचलून नेले त्यामुळे गुन्हा दाखल झाला. या अगोदर तीन वीटभट्टी मालकांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. मजुरांना स्वावलंबी बनू द्या, बयाना देऊन त्यांना अपंग करायचे मग त्यांचे शोषण करायचे हे अनिष्ट आहे, त्यांना रोजगार हवा आहे हे खरे आहे, मात्र त्याबाबदल्यात त्यांना योग्य मोबदला आणि सन्मान मिळणे हा त्यांचा हक्क आहे असं पंडित यांनी सांगितलं. आम्ही मालकांचे वैरी नाही मात्र मजुरांचे शोषण झाले तर कारवाई होणार मग त्यानंतर संघटनेला कुणीही दोष देऊ नका असे पंडित यांनी पुन्हा अधोरेखीत केले.