डॅशिंग महिला पोलीस कर्मचाऱ्याची थेट आमदारावर कारवाई, वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्याने दंड
वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी इशारा करून वाहन निश्चित केलेल्या वळणावरून वळविण्याची सूचना केली. परंतु चालकाने पोलिसांचे काहीही न ऐकता वाहन थेट पेट्रोल पंपावर नेले.
हिंगोली : गाडी चुकीच्या दिशेने वळवली म्हणून वाहतूक शाखेच्या एका डॅशिंग महिला पोलीस कर्मचाऱ्याने थेट आमदारालाच दंड ठोठावला आहे. हिंगोली शहरातील गांधी चौकात हा सर्व प्रकार घडला आहे. आज झालेली ही कारवाई हिंगोलीत चर्चेचा विषय ठरली आहे.
हिंगोली शहरातील गांधी चौकामध्ये असलेल्या चौधरी पेट्रोल पंपाकडे जाताना गाडी चुकीच्या दिशेने वळवली म्हणून हिंगोली विधानसभा मतदार संघाचे भाजपचे विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांना हिंगोली वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांने ऑनलाईन दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. आमदार तान्हाजी मुटकुळे यांची कार एमएच -38 व्ही -4499 अकोला रस्त्याने येऊन चौधरी पेट्रोल पंप कडे डिझेल भरण्यासाठी जात होती. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाला वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी इशारा करून वाहन निश्चित केलेल्या वळणावरून वळविण्याची सूचना केली. परंतु चालकाने पोलिसांचे काहीही न ऐकता वाहन थेट पेट्रोल पंपावर नेले.
मात्र नियम मोडल्यानंतर वाहतूक शाखेच्या पथकाने वाहन अडवून त्यांना दोनशे रुपयाचा दंड ठोठावला. गेल्या महिन्यात आमदार तान्हाजी मुटकुळे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाहतूक शाखा वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यावर करत असलेली कार्यवाही थांबवण्याची मागणी केली होती. तसेच वाहतूक शाखेच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
इतर बातम्या