कायदा मोडल्याने महिला कॉन्स्टेबलने थेट राज्यमंत्र्यांना जाब विचारला; व्हिडीओ व्हायरल
गुजरातचे आरोग्य राज्यमंत्री कुमार कानाणी यांचा मुलगा प्रकाश कानाणी कर्फ्युचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आपल्या समर्थकांना सोडवण्यासाठी आले होते. परंतु, महिला कॉन्स्टेबल सुनीता यादवने प्रकाश कानाणी यांना कायदा समजावून सांगत त्यांच्या समर्थकांना सोडण्यास नकार दिला.
गुजरात : सूरत येथील एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. या महिला कॉन्स्टेबलने सिद्ध केलं आहे की, आपलं काम आणि कर्तव्यापेक्षा मोठं काहीच नसतं. गुजरातचे आरोग्य राज्यमंत्री कुमार कानाणी यांचा मुलगा प्रकाश कानाणी कर्फ्युचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आपल्या समर्थकांना सोडवण्यासाठी आले होते. परंतु, महिला कॉन्स्टेबल सुनीता यादवने प्रकाश कानाणी यांना कायदा समजावून सांगत त्यांच्या समर्थकांना सोडण्यास नकार दिला. महिला कॉन्स्टेबल आणि राज्यमंत्री यांच्यामध्ये फोनवरून बराच वेळ चर्चा झाली. साधरणपणे दीड तास सुरु असलेल्या या नाट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुनीता यादव यांना रजेवर पाठवण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून सुनीता यादव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, 'इमानदारीने काम करणाऱ्या ऑफिसर्सना ड्यूटी सांगू नका. आपल्या बिघडलेल्या मुलांना ताब्यात ठेवा! अशा बिघडलेल्यांना सुधारण्यासाठी सुनीता यादवप्रमाणे आणखी ऑफिसर्सनी पुढे येण्याची गरज आहे.'
काय आहे संपूर्ण प्रकरण?
शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास कर्फ्यु दरम्यान, राज्यमंत्री कुमार कानाणी यांचे समर्थक मास्क न घातला सूरतच्या वारक्षामध्ये फिरत होते. यादरम्यान, ड्यूटीवर तैनात असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने त्यांना रोखलं. त्यानंतर प्रकाश कानाणी आपल्या समर्थकांना सोडवण्यासाठी तिकडे पोहोचले. परंतु, महिला कॉन्स्टेबलने त्यांचं ऐकलं नाही आणि वडिलांशी बोलणं करून देण्यास सांगितले.
सुनीता यादवने आरोग्य राज्यमंत्री कुमार कानाणी यांच्याशी बोलताना त्यांना प्रश्न विचारला की, जेव्हा संपूर्ण शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे, तर तुमचे समर्थक मास्क न लावता घराबाहेर कसे पडले? नियम-कायदे सर्वांसाठी वेगवेगळे आहेत का? तसेच, पुढे बोलताना महिला कॉन्स्टेबल म्हणाली की, तुम्ही गाडीत नसून देखील तुमच्या नावाची प्लेट गाडीवर का लावण्यात आली आहे?
संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, महिला कॉन्स्टेबल आपलं कर्तव्य पार पाडत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्यमंत्र्यांचा आरोप आहे की, महिला कॉन्स्टेबल त्यांचा मुलगा प्रकाश कानाणी यांचा अपमान केला. त्यानंतर पोलीसांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. असं सांगण्यात येत आहे की, यंत्रणेच्या भोंगळ कारभाराला कंटाळून सुनीता यादव यांनी राजीनामा दिला आहे.