बलात्कार प्रकरणातील आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह
बीडमध्ये तर कारागृहात रवानगी झालेल्या कोणत्याही कैद्याची पोलीस दलाकडून कोरोना चाचणी केल्याशिवाय त्याला कारागृहात ठेवले जात नाही. बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीची माजलगाव पोलिसांनी कोरोना चाचणी करून घेतली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे.
बीड : एका बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या व्यक्तीलाच कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आल्याने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.बलात्काराच्या प्रकरणातील हा आरोपी माजलगावचे पोलीस कर्मचारी तसेच बीड मधील तात्पुरत्या कारागृहातील कैद्यांसोबतच माजलगावमधील न्यायालयातील अनेकांच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वॉरांटाईन करण्यात आले आहे.
राज्यभरातील अनेक कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे यापूर्वीच पुढे आले होते. म्हणूनच कोणत्याही स्वरूपाची शिक्षा झालेल्या कैद्यांना थेट तुरुंगात पाठवण्या आधी एका तात्पुरत्या तुरुंगामध्ये 14 दिवस ठेवले जाते. बीडमध्ये तर कारागृहात रवानगी झालेल्या कोणत्याही कैद्याची पोलीस दलाकडून कोरोना चाचणी केल्याशिवाय त्याला कारागृहात ठेवले जात नाही. बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीची माजलगाव पोलिसांनी कोरोना चाचणी करून घेतली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे.
लॉकडाऊन मध्येच महिलेला पळवून नेले
बीड च्या माजलगाव तालुक्यातील जदीद जवळा येथील एका दोन मुलांच्या पिता असलेल्या 26 वर्षीय तरुणाने चार मुलांची आई असलेल्या 30 वर्षीय महिलेला 17 जून रोजी पुणे या ठिकाणी पळवून घेऊन गेला होता. त्यानंतर जवळपास पंधरा ते वीस दिवस हे पळून गेलेले जोडपे पुण्यामध्येच राहायला होते.
स्वतः पेक्षा चार वर्ष मोठे असलेल्या आणि चार मुलांची आई असलेल्या महिलेसोबत पळून गेलेला हा तरुण आणि महिला अखेर 8 जुलै रोजी हे पुण्याहून परत आले. माजलगाव मध्ये परत आल्यानंतर हे जोडपे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले.या वेळी महिलेने या व्यक्तीने पळवून नेऊन बलात्कार केल्याची फिर्याद दिली त्यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तीन ते चार आठवड्यांचा कालावधी ज्या पुरुषासोबत घालवल्यानंतर त्याच पुरुषाच्या विरोधामध्ये बलात्काराची तक्रार दिल्यावरून अखेर या व्यक्ती विरोधात बलात्काराचा गुन्हा माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. 9 जुलै रोजी आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली .
विशेष म्हणजे बलात्काराच्या प्रकरणातील हा आरोपी पुण्यावरून आल्यामुळे त्याचा स्वॅब 13 जुलैला घेण्यात आला. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलीस दलात एकाच खळबळ उडाली आहे. माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन चा लॉकअपमध्ये हा आरोपी तीन दिवस राहिला होता. त्यानंतर दोन वेळा या आरोपीला न्यायालयांमध्ये नेण्यात आले होते. या सोबतच बीडमध्ये बनवण्यात आलेले तात्पुरत्या कारागृहात सुद्धा इतर काही त्यासोबत हा आरोपी राहत असल्याने आता खळबळ उडाली आहे.