Omicron : चिंता वाढली; पिंपरी चिंचवडमध्ये चार तर मुंबईत तीन नवे ओमायक्रॉनचे रुग्ण
Omicron Cases In Maharashtra : राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाची संख्या 17 इतकी झाली.
Omicron Cases In Maharashtra : राज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे, कारण आज दिवसभरात राज्यात ओमायक्रॉनचे सात रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये चार तर मुंबईत तीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाची संख्या 17 झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज आणखी चार रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. हे चारही रुग्ण नायजेरियाहून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे शहराचा ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा दहावर जाऊन पोहचलाय. शुक्रवारी पिंपरीतील चार ओमायक्रॉनचे रुग्ण निगेटिव्ह आले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र, या संपर्कातील चार रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या चिंतेत भर पडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनच्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 22 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज नव्या सात ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील तीन तर पिंपरी चिंचवडमधील चार रुग्णांचा समावेश आहे. मुंबईत आढळलेले तीन रुग्ण हे 48, 25 आणि 37 वर्षांचे आहेत. हे रुग्णांनी टांझानिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशातून प्रवास केलाय.
आज आढळलेल्या सात रुग्णापैकी चार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एका रुग्णाने लसीचा एकच डोस घेतलाय तर एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. एका रुग्णाचे वय साडेतीन वर्ष आहे, याचं लसीकऱण झालेलं नाही. आज आढळलेल्या ओमायक्रॉनच्या सात रुग्णापैकी चार रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. तर तीन रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत.
मुंबईत तीन रुग्ण -
टांझानिया येथून चार डिसेंबर रोजी आलेल्या एका 48 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या व्यक्तीचे कोविड लसीकरण शिल्लक आहे. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. सदर रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील दोन व्यक्तीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही. 25 वर्षीय लंडनवरुन आलेल्या व्यक्तीलाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या रुग्णाचे कोविड लसीचे दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. सदर रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही. एक 37 वर्षीय पुरुष (गुजरातचा रहिवासी) दक्षिण आफ्रिका येथून आलेल्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. रुग्णाच्या कोविड लशीच्या दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळावरूनच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत.
राज्यात आज 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 631 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 90 हजार 936 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 534 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 290 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 870 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 66 , 39, 988 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
संबंधित बातम्या :