संयम सुटतोय! मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये तीन दिवसांत तीन आत्महत्या; आज पुन्हा 32 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन
Maratha Reservation : सरकार मराठ्यांना आरक्षण का देत नाही? अशा आशयाची चिठ्ठी लिहून या तरुणाने स्वतःच्या शेतातल्या आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.
लातूर : सरकार मराठ्यांना आरक्षण का देत नाही? असा प्रश्न करत बत्तीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील गोंद्री येथे समोर आली आहे. मागील तीन दिवसांत मराठा आरक्षणासाठीची (Maratha Reservation) ही तिसरी आत्महत्या (Suicide) आहे. शरद वसंत भोसले (वय 32 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे.
मराठा आरक्षणाचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चा, ठिय्या आंदोलन, उपोषण अश्या अनेक मार्गाने सरकारपर्यंत आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, काही तरुण भावनिक होऊन टोकाचे पाऊल उचलत आहे. लातूर जिल्ह्यातील गोंद्री (ता.औसा) येथील मराठा तरुण शरद वसंत भोसले यांनी आज सकाळी आत्महत्या केली आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण का देत नाही? अशा आशयाची चिठ्ठी लिहून या तरुणाने स्वतःच्या शेतातल्या आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. हा तरुण अवघ्या 32 वर्षाचा असून, घरात पत्नी, दोन मुली, आई-वडीलांसह भाऊ असा परिवार आहे.
तीन दिवसात जिल्ह्यातील तिसरी आत्महत्या....
'मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे' अशी चिठ्ठी लिहून लातूर जिल्ह्यातील माजी सरपंचाने आळंदी येथील इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केली होती. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांनी शुक्रवारी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. आज त्यांचा मृतदेह लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तहसील समोर आणण्यात आला आहे. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांचा मुळगाव उमरदरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तर दुसऱ्या घटनेत "दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही' असं स्टेटस ठेवून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव येथे समोर आली आहे. महेश कदम असं मयत युवकाचे नाव आहे. घरची परिस्थिती चांगली असली तरी मराठा आरक्षणाबाबत महेश चिंतेत होता. त्यामुळे त्याने विषारी औषध घेत जीवन संपवलं आहे. या दोन आत्महत्यांच्या घटना ताज्या असतानाच आज पुन्हा लातूर जिल्ह्यातील गोंद्री येथील शरद वसंत भोसले याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.
मराठवाड्यातील सातवी आत्महत्या...
मागील काही दिवसांत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यात होणाऱ्या आत्महत्या वाढल्या आहेत. मागील चार दिवसांत मराठवाड्यात सात आत्महत्या झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आक्रमक होत असतानाच भावनिक होऊन आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल देखील उचलत आहे. विशेष म्हणजे तरुणांनी आत्महत्या करू नयेत असे आवाहन सतत मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maratha Reservation : मराठवाड्यात 3 दिवसांत 6 आत्महत्या, मराठा आरक्षणावरून तरुण उचलतायत टोकाचे पाऊल