Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर; चंद्रकांत पाटलांनी पूर्वतयारी आढावा बैठकीत दिल्या सूचना
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दौरा यशस्वी करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 19 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दौरा यशस्वी करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उप जिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
प्रशासनाने वाहतुकीचे योग्य नियोजन करावे
चंद्रकांत पाटील म्हणाले की, अमित शहा (Amit Shah In Kolhapur) 19 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राजर्षी शाहू महाराज पुतळा या ठिकाणी जाऊन अभिवादन करणार आहेत. त्याप्रमाणेच अन्य कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. अनुषंगाने जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने व याच दिवशी कणेरी मठाच्या वतीने शहरात शोभायात्रा नियोजित आहे. तरी प्रशासनाने वाहतुकीचे योग्य ते नियोजन करावे व कोणत्याही कार्यक्रमाला वाहतुकीचा अडथळा होणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी केल्या.
महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच छत्रपती शाहू महाराज पुतळा सुशोभीकरण करून घ्यावे. कोल्हापूर शहरात सर्वत्र स्वच्छता ठेवावी, अशा सूचना पाटील यांनी केल्या. 20 ते 26 फेब्रुवारी कालावधीत सुमंगलम पंचमहाभूत लोकमहोत्सवाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी केलेल्या कामाची माहिती त्यांनी घेतली व हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करावे, असेही त्यांनी सुचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी 19 फेब्रुवारी रोजी साजरी होणारी शिवजयंती तसेच केंद्रीय गृहमंत्री दौरा अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असे सांगितले. पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. तसेच दिनांक 19 फेब्रुवारी होणाऱ्या शिवजयंती महोत्सव व शोभायात्रेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या वाहतुकीतील बदलाबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येऊन सर्व नियोजित कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या