Raju Shetti : राजू शेट्टींसाठी शेतकऱ्यांचे काय पण ! आधी वर्गणी काढून खासदार केले आणि आता नवी कोरी फॉर्च्युनर दिली भेट
राजू शेट्टींना खासदार करणाऱ्या शेतकऱ्यांनी पै पै गोळा करून नवी कोरी अलीशान फॉर्च्युनर कार भेट दिली आहे. त्यामुळे राजू शेट्टी चांगलेच भारावून गेले आहेत. रविकांत तुपकर यांनाही कार भेट देण्यात आली आहे.
Raju Shetti : शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्षासाठी अनेकवेळा रक्त सांडलेल्या माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींवरील शेतकऱ्यांचे प्रेम काही नवीन नाही. लोकवर्गणी काढून राजू शेट्टींना खासदार करणाऱ्या शेतकऱ्यांनी पै पै गोळा करून नवी कोरी अलीशान फॉर्च्युनर कार भेट दिली आहे. त्यामुळे राजू शेट्टी चांगलेच भारावून गेले आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविकांत तुपकर यांनाही लोकवर्गणीतून कार भेट दिली आहे. एकाचवेळी दोघांना कार लोकवर्गणीतून देत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांवरील प्रेम अधोरेखित केलं आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
राजकीय नेत्यांचा राजेशाही थाट आणि त्यांचा अलीशान गाड्यांचा थाट सर्वसामान्यांचे डोळे चांगलेच विस्फावून जातात. मात्र, शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत असलेल्या राजू शेट्टी यांचा प्रवास याला नक्कीच अपवाद राहिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मात्तबरांविरोधात लढण्यासाठी खासकरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांना नेहमीच शंभर हत्तीचे बळ दिले आहे. त्यामुळेच राजू शेट्टींचा प्रवास खासदारकीपर्यंत पोहोचला. राजू शेट्टी यांनी 2009 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शड्डू ठोकल्यानंतर शेतकऱ्यांनीच लोकवर्गणी काढून त्यांना आर्थिक पाठबळ दिले होते.
कार्यकर्त्यांनी दिलेल्या या अलीशान भेटनंतर दस्तुरखुद्द राजू शेट्टी चांगलेच भारावून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून आभार मानले आहेत. ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, धन्यवाद सांगली-कोल्हापूरकर. आजपर्यंत कोणालाही विकलो गेलो नाही. इथून पुढेही विकलो जाणार नाही. चळवळीत आणि राजकारणात काम करत असताना जनतेशी प्रामाणिक राहिल्याबद्दल तुम्ही लोकवर्गणीतून जे बक्षिस दिलं आहे त्याचा मी कृतज्ञपूर्वक स्वीकार करतो.
बुलढाणाकरांच्या लोकवर्गणीतून रविकांत तुपकरांना चारचाकी 'लोकरथ' प्रदान
शेतकरी प्रश्नांची सोडवणूक, आंदोलनानिमित्ताने अख्खा महाराष्ट्र पालथा घालावा लागत असलेल्या रविकांत तुपकर यांच्याकडे अगदी कालपर्यंत स्वत:ची चारचाकी गाडी नव्हती. आतापर्यंत मित्रांनी दिलेल्या गाड्यांनीच चळवळीचं 'सारथ्य' केलं होतं. आपल्या कार्यकर्त्याला सांभाळणं, जपणं ही आपल्या समाजाचीच जबाबदारी आहे, या विचारांतून बुलढाण्यातील सर्वच क्षेत्रातील अराजकीय मंडळी एकत्र आली. अन् यातूनच समोर विचार आला तो लोकवर्गणीतून त्यांना चारचाकी वाहन घेऊन देण्याचा. हे वाहन लोकवर्गणीतून देण्यात येणार असल्याने त्याला 'लोकरथ' असं नाव देण्यात आलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या