Satej Patil : आम्ही रामायण करणारी मंडळी, महाभारत घडलं, तर जनता पांडवाचं रूप घेऊन काय करायचं ते करेल! सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला
खासदार धनंजय महाडिक यांना सतेज पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आम्हीही रामायण करणारी मंडळी आहोत, महाभारत घडलं, तर जनता पांडवाचं रूप घेऊन काय करायचं ते करेल असे म्हटले आहे.
Satej Patil Vs Dhananjay Mahadik : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आता महाभारतच घडणार असून आता वाईटाचा नाश होणार असल्याचा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना दिला होता. त्यानंतर आता सतेज पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत आम्हीही रामायण करणारी मंडळी आहोत, महाभारत घडलं, तर जनता पांडवाचं रूप घेऊन काय करायचं ते करेल असे म्हटले आहे.
गोकुळ तसेच राज्यांमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 29 ऑगस्ट रोजी होत आहे. विरोधकांचा मुकाबला करण्यासाठी सत्ताधारी गटाकडून रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर बोलताना सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
ते म्हणाले की, चांगलं जे करता येईल ते आम्ही करत असतो. महाभारत घडलं, तर जनता पांडवाच रूप घेऊन काय करायचं ते करेल. गेल्या अडीच वर्षात मी आणि हसन मुश्रीफ यांनी विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. विमानतळासाठी निधी खेचून आणला. सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न केला. अजून निवडणुका लांब आहेत, त्यावेळी बोलायचं ते बोलू.
स्थानिक पातळीवर संजय मंडलिक सोबत असतील
आमचं ठरलंय म्हणून आघाडी धर्म बाजूला करून निवडून आणलेल्या संजय मंडलिक यांनी बंडखोरी केली आहे. याबाबत त्यांना विचारले असता, सतेज पाटील म्हणाले की, स्थानिक पातळीवर खासदार मंडलिक आमच्या बरोबर आहेत याची खात्री आहे. याबाबत आमची अनेक वेळा चर्चा झाली आहे. राष्ट्रीय पातळीवरील मुद्दे वेगळे असतात.
हद्दवाढीसाठी ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेतले पाहिजे
कोल्हापूरच्या हद्दवाढीवरून सतेज पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, ग्रामीण भागातील लोकांना विश्वासात घेऊन हद्दवाढ झाली पाहिजे. त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली पाहिजेत. यामध्ये कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये.
योग्यवेळी उत्तर देऊ : धनंजय महाडिक
दरम्यान, सतेज पाटील यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर धनंजय महाडिक यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सतेज पाटील यांना योग्यवेळी उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया दिली.
दहीहंडीमध्ये काय म्हणाले होते धनंजय महाडिक?
दसरा चौकात दहीहंडी कार्यक्रमात बोलताना धनंजय महाडिक म्हणाले होते की, महाडिक गटाचे सलग पराभव झाले. विरोधकांनी कुटनीतीने खोट्या केसेस दाखल करून महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला. यामुळे येथून पुढे जिल्ह्याच्या राजकारणात महाभारतच होणार आहे.
राजकारणात कोणी कायम टिकत नसतो. आमचे सलग पराभव झाले. मोठे नैराश्य आले होते. कुटनीती, कपटनीतीने अभिमन्यूला घेरले, तसे मला घेरले. अडीच वर्षे प्रचंड त्रास दिला. प्रशासनावर दबाव आणून आमच्या कारखान्याचे सभासद रद्द केले. शिक्षण संस्था बंद पडण्याचा प्रयत्न केला. राजकारण हे एक चक्र आहे. आज आमचे दिवस आले आहेत. यापुढे वाईट्याचे वाईट होईल, असे खासदार धनंजय महाडिक म्हणाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या